प्राथमिकचे विद्यार्थी कृतिशील शिक्षणात रमले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:25 AM2021-07-20T04:25:57+5:302021-07-20T04:25:57+5:30
कऱ्हाड : फलटण तालुक्यातील गिरवी केंद्रातील माळेवस्ती येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापक व वर्गशिक्षिका तृप्ती कुमठेकर यांनी ऑनलाईन शिक्षण ...
कऱ्हाड : फलटण तालुक्यातील गिरवी केंद्रातील माळेवस्ती येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापक व वर्गशिक्षिका तृप्ती कुमठेकर यांनी ऑनलाईन शिक्षण योजनेंतर्गत तिसरी व चौथीतील विद्यार्थ्यांसाठी मातीकाम, कला, कार्यानुभव विषयांवरील कृतिशील शिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी प्रयोगशील अध्यापन पद्धती त्यांनी अवलंबली आहे.
कृतिशील शिक्षण पद्धतीत विद्यार्थ्यांना कृतीला वाव व संधी मिळत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच माळेवस्ती शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कृतिशील शिक्षण देण्यात येत आहे. कृतिशील शिक्षण पद्धतीत विद्यार्थ्यांचा मन, मेंदू आणि मनगट बळकट करण्यासाठी नियोजन व कार्यवाही करण्याबाबत योग्य ती काळजी घेऊनच शैक्षणिक मार्गदर्शन करण्यात येत आहे. विद्यार्थी कृतिशील शिक्षणासाठी आनंददायी, प्रसन्न आणि हसतमुख असतात. घर व परिसरात पालकांच्या निरीक्षणाखाली ते शिकतात. कृतिशील शिक्षणातून स्वनिर्मितीचा आनंद विद्यार्थी घेतात. माती आणि पाणी यामधून नवनिर्मिती करण्यात विद्यार्थी रममाण होतात. मातीकाम, कागदकाम, कला, संगीत, कायार्नुभव, चित्रकला या विषयांमधून मराठी, गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल, परिवार अभ्यास या विषयांवर ऑनलाईन पद्धतीने शिक्षण हसत खेळत आनंददायी पद्धतीने देता येते.
माळेवस्ती शाळेप्रमाणे गिरवी व आरडगाव केंद्रातील जिल्हा परिषद व माध्यमिक शाळांमधून शैक्षणिक विकासासाठी विविध माध्यमातून ऑनलाईन शिक्षणाचे नियोजन करण्यात आले असल्याचे गिरवी व आरडगाव केंद्राचे केंद्रप्रमुख अनिल कदम यांनी सांगितले.
फोटो : १९ केआरडी ०२
कॅप्शन : फलटण तालुक्यातील माळेवस्ती येथील प्राथमिक शाळेचे विद्यार्थी कृतिशील शिक्षणात रमल्याचे दिसून येत आहे.