वाईच्या पश्चिम भागात रोज आठ तास भारनियमन
By admin | Published: February 10, 2015 10:30 PM2015-02-10T22:30:43+5:302015-02-10T23:56:12+5:30
शेतकरी त्रस्त : भारनियमन बंद करण्याची मागणी
वाई : वाई तालुक्याच्या पश्चिम भागात गेल्या एक महीन्यापासून आठ तास लोडशेडींंग करण्यात येत आहे. लोडशेडिंगमुळे शेतकरी व ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे भारनियमन कमी करण्याची मागणी शेतकऱ्यांनी महावितरण अभियंत्यांना निवेदनाद्वारे केली आहे.वाई तालुक्यातील पश्चिम भागात महावितरण कंपनीने कोणतीही पुर्व सूचना न देता गेल्या एक महीन्यापासून भारनियमन सुरु केले आहे. त्यामुळे शेतातील गहू, ज्वारी व हरभरा ही पीके वाया जाण्याची भिती निर्माण झाली आहे. वीज पुरवठा सिंगल फेज असताना पश्चिम भागात आठ तासाचे भारनियमन करण्यात येत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांसह ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सध्या वाई तालुक्यात वार्षिक यात्रा सूरू झाल्या असून भारनियमनामुळे याचा फटका यात्रांनाही बसत आहेत तसेच दहावी , बारावीच्या वार्षिक परिक्षा जवळ आल्याने विदयार्थ्यांना अभ्यास करताना अनेक अडचणींना सामोरे जावे जागत आहे़ अन्यायकारक भार नियमन महावितरण कंपनीने तत्काळ बंद न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांच्यावतीने महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनावर काळेश्वर चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक ज्ञानदेव सणस, अध्यक्षा सुभद्राताई सणस, सरपंच शंकर सणस, रामचंद्र तुपे, प्रकाश वाडकर, चंद्रकांत सणस, माजी उपसभापती चंद्रकांत सणस, नाना चिकणे , महेंद्र गुरव यांच्यासह बोरगांव, आसरे, खावली, वेंलंग, रेणावळे, कोंढावळे, गाढवेवाडी, किंरूडे, वयगांव, घेरा केंजळ या गावातील ग्रामस्थांच्या सह्या
आहे. (प्रतिनिधी)
पीके तोंडाशी आली असताना भारनियमन सुरु झाले आहे. शेतीसह शाळेय विद्यार्थ्यांनाही याचा फटका बसत आहे. महावितरणने भारनियमन तत्काळ बंद करुन शेतकऱ्यांची व ग्रामस्थांची होणारी परवड थांबवावी
- रामचंद्र तुपे, शेतकरी
सध्या शेतीपंपाला वीजेची मागणी वाढल्यामुळे भारनियमन करावे लागत आहे. भारनियमन कमी करण्याबातत लवकरच तोडगा काढण्यात येईल.
- एस. के. पाटील,
अतिरिक्त कार्यकारी अभियंता