अकरा अतिरिक्त कर्मचारी आॅक्टोबरपासून बिनपगारी
By admin | Published: February 22, 2015 08:30 PM2015-02-22T20:30:21+5:302015-02-23T00:22:12+5:30
समायोजनची प्रतीक्षा : २०१२-१३ मधील अतिरिक्त शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे थकित वेतन
सातारा : सातारा जिल्ह्यातील २०१२-१३ च्या शिक्षक निश्चितीनुसार अनुदानित शाळेवरील सहा लिपिक व पाच शिपायांना अतिरिक्त ठरविण्यात आले होते. त्यामुळे त्यांना आॅक्टोबर २०१४ पासून पगार मिळालेला नाही. त्याना वेतन देऊन समायोजन करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.संबंधित सहा लिपिक व शिपयांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सातारा जिल्हा परिषदेतील शिक्षणाधिकाऱ्यांनी १५ मार्च २०१४ रोजी दिलेल्या आदेशानुसार सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात अतिरिक्त कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये रिक्त पदांअभावी संबंधित अकरा जणांचे अद्याप समायोजन झालेले नाही. अतिरिक्तपदी समायोजन न झालेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन सप्टेंबर २०१४ पर्यंत करण्यात यावे, असे आदेश १४ आॅक्टोबर २०१४ व १७ आॅक्टोबर २०१४ च्या शासन परिपत्रकानुसार देण्यात आले आहेत. परंतु, महाराष्ट्र राज्य पुणे आयुक्त कार्यालयाकडे रिक्त पदांअभावी समायोजन न झाल्याने व अशाच समायोजन करणे व आॅक्टोबर २०१४ पासूनचे वेतन मिळण्याविषयी प्रस्ताव पाठविला आहे. पुण्याचे प्राथमिक शिक्षण आयुक्त व महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालक यांच्याकडे २०१२-१३ मधील कर्मचारी अतिरिक्त ठरल्यानंतर केलेल्या कारवाईचा अहवाल दिला होता.
वारंवार संपर्क साधूनही आयुक्त कार्यालयाकडून कोणतीही कार्यवाही केलेली आहे. यासंदर्भात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी संपर्क साधून प्रस्ताव पाठविला आहे. तरीही वेतन व समायोजनाविषयी कोणताही निर्णय देण्यात आलेला नाही, असेही पत्रकात म्हटले आहे. निवेदनावर सहा शिक्षक व पाच शिपायांच्या सह्या आहेत. (प्रतिनिधी)
उपासमारीची वेळ
सातारा जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षण विभागात कार्यरत असलेले सहा लिपिक व पाच शिपायांचे पाच महिन्यांपासून पगार झालेला नाही. त्यातील अनेकांचे लग्न झालेले आहे. त्यांच्यावरच कुटुंबीयांची जबाबदारी आहे. वेतन मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असून, समस्या वाढल्या आहेत. त्यामुळे वेळेवर पगार न झाल्यास आत्मदहन करण्याची वेळ आली आहे, असा इशारा देण्यात आला आहे.