कास तलावात साडेअकरा फूट पाणीसाठा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:41 AM2021-05-18T04:41:32+5:302021-05-18T04:41:32+5:30
पेट्री : सातारा शहराच्या पश्चिमेस कास परिसरात रविवारी दुपारपासून आभाळ तसेच वादळी वाऱ्याची परिस्थिती होती. दुपारी ...
पेट्री : सातारा शहराच्या पश्चिमेस कास परिसरात रविवारी दुपारपासून आभाळ तसेच वादळी वाऱ्याची परिस्थिती होती. दुपारी तीननंतर मध्यम स्वरूपात पावसाला सुरुवात होऊन सोमवारी दुपारपर्यंत संततधार कायम राहत अधूनमधून जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला. कास पठार परिसरात सर्वत्र दाट धुके पडले होते. दरम्यानच्या पावसामुळे ओढ्यांना पाणी येऊन काही ठिकाणचे छोटे-मोठे धबधबे प्रवाहित झाले. शेतात, रस्त्यावर पाणी साचल्याचे दिसून येत होते. या पावसामुळे कास तलावाची व कुमुदिनी तलावाची पाणीपातळी वाढण्यास मदत झाली. अद्यापही पावसाची संततधार कायम आहे.
कास पठाराच्या सड्यावरून काही प्रमाणात पाणी वाहत होते. आजच्या पावसाने परिसरात मोठ्या प्रमाणावर गारठा जाणवू लागला आहे. या सततच्या पावसाने जनावरांना चरण्यासाठी हिरवं गवत उपलब्ध होण्याचा फायदा होत आहे. तसेच जमिनीत पाणी मुरून झरेदेखील फुटण्यास मदत झाली. तौक्ते चक्रीवादळाच्या पावसाच्या तडाख्याने परिसरात काही ठिकाणी छोट्या स्वरूपात पडझडीच्या घटना घडून काही ठिकाणी छोट्यामोठ्या स्वरूपात झाडे उन्मळून पडली. तसेच वादळी वारा व मुसळधार पावसामुळे बहुतांश ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता. काही गावात दोन-दोन, चार-चार दिवस वीजपुरवठा खंडित झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. दरम्यान, मोबाइल बॅटरी चार्ज नसल्याने संपर्काचा खोळंबा उडाला होता. काहींनी तर नामी शक्कल लढवून आपापली चारचाकी वाहने चालू ठेवून संपर्क करण्यापुरतीच्या गरजेसाठी मोबाइल बॅटऱ्या चार्ज केल्या.
(चौकट)
काही दिवसांपूर्वी कास तलावाची पाणीपातळी अगदी साडेआठ फुटांपर्यंत आली होती. त्यामुळे शहराच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत असताना दोन-चार वेळा झालेला वळीव पाऊस व तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसून आत्तापर्यंत एकूण तीन फूट पाणी पातळी वाढून सध्या तलावाची पाणीपातळी साडेअकरा फुटांवर पोहोचली आहे.
कोट
रविवारी दुपारपासून सुरू झालेल्या पावसाने तलावाची पाणी पातळी वाढण्यास मदत झाली असून, एका दिवसात दीड फूट पाणीसाठा वाढल्याने ही बाब समाधानकारक आहे.
- जयराम किर्दत, पाटकरी, कास तलाव