जिल्ह्यातील अकरा कारखान्यांचा ‘पट्टा पडला’

By admin | Published: June 2, 2015 12:30 AM2015-06-02T00:30:53+5:302015-06-02T00:30:53+5:30

‘सह्याद्री’ सहा जूनपर्यंत चालणार : ७५ लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप; ८८ लाख क्विंटल साखरेची निर्मिती

Eleven factories in the district have 'strapped' | जिल्ह्यातील अकरा कारखान्यांचा ‘पट्टा पडला’

जिल्ह्यातील अकरा कारखान्यांचा ‘पट्टा पडला’

Next

वाठार स्टेशन : सातारा जिल्ह्यातील सह्याद्री सहकारी साखर कारखाना वगळता उर्वरीत सर्वच साखर कारखान्यांनी आपल्या चालू गाळप हंगामातील नोंद असलेल्या संपूर्ण ऊसाचे गाळप करीत या हंगामाचा यशस्वी समारोप केला. गतवर्षीच्या तुलनेत चालू हंगामात वाढ होवून या हंगामात ७५ लाख मे. टन उसाचे गाळप करीत जवळपास ८८ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन जिल्ह्यातील कारखान्याकडून झाले आहे.
‘कही खुशी कही गम’ याप्रमाणे चालू हंगाम हा कारखानदार तोडकऱ्यांसाठी दिवाळीचा तर ऊस उत्पादकांसाठी मात्र शिमगाच ठरला. या हंगामाच्या शुभारंभा पासूनच ऊस दराचे नैराश्य कायम राहिले. गतवर्षी प्रमाणे चालू वर्षी कोणतीही संघटना ऊस दरासाठी रस्त्यावर उतरलीच नसल्याने कारखानदारांनी आपल्या इच्छेप्रमाणे ऊस दर जाहीर करण्याचा प्रयत्न केला. परंतु हा दर देताना केंद्राने जाहीर केलेल्या एफआरपी प्रमाणे दर देण्याचे बंधन नव्या सरकारने घेतल्याने जिल्ह्यातील किसनवीर, प्रतापगड, अजिंक्यतारा, सह्याद्री कारखान्यांनी एफआरपी पोटी पहिला हप्ता देऊन उर्वरीत रक्कम दुसऱ्या हप्त्याने देण्याची भूमिका घेत शासनाच्या मदतीची अपेक्षा व्यक्त केली.
राज्य शासनाने ही कारखानदारांसाठी पॅकेज जाहीर केले. मात्र याची अंमलबजावणी अद्याप झालीच नसल्याने चालू हंगाम संपला तरी एफआरपी रक्कमेचा फरक शेतकऱ्यांच्या ऊस बील खात्यावर जमा झाला नाही. यामुळे यापुढे हा फरक मिळेल याबाबत प्रश्नच उपस्थित होत आहे.
प्रतीवर्षी ऊस दराच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी चालू वर्षी गाळप हंगामापूर्वीच ऊस दर नियंत्रण समितीची स्थापणा झाली. मुख्यमंत्र्यांच्या सचिवांना या कमिटीचे अध्यक्ष बनविले. व शेतकरी संघटना, प्रतिनिधी व कारखानदार प्रतिनिधी अशी कमिटी स्थापण झाली. या कमिटीबाबत ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अपेक्षा होत्या मात्र, ही कमिटी पहिल्याच मिटिंगमध्ये कारखानदार व शेतकरी संघटना पदाधिकाऱ्यात ऊसदराबाबत एकमत न झाल्याने कमिटी बंद पडली.
हंगामात नव्याने गोपूज येथील ग्रीन पॉवर शुगर लिमिटेड या कारखान्याची भर पडली. या शिवाय फलटण येथील स्वराज इंडिया या कारखान्यानेही चाचणी गाळप हंगाम घेतल्यामुळे जिल्ह्यातील आव्हानात्मक वाटणारे ऊसाचे क्षेत्र संपविण्याचे काम वेळेत साध्य झाले. जिल्ह्यात सद्य:स्थितीस सह्याद्री हा एकमेव साखर कारखाना सुरू असून ६ ते ७ जून पर्यंत सह्याद्री कार्यक्षेत्रातील नोंद असलेला संपूर्ण ऊस गाळप केला जाईल, असा विश्वास कारखाना प्रतिनिधींनी व्यक्त केला आहे. (वार्ताहर)
तोडकऱ्यांनी केला जल्लोष
कारखान्याचा पट्टा पडण्याचा दिवस म्हणजे ऊस तोडणी मजुरांसाठी एक प्रकारे आनंद सोहळाच असतो. या दिवशी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची नारळ व ऊसाच्या छावळ्यांनी सजावट केली जाते. तसेच गुलाल व फटाक्यांच आतषबाजी करीत ऊसाने भरलेल्या वाहनांनी मिरवणूक काढली जाते. ऊस तोडणी मजूर या दिवसाचे मोठ्या जलोषात स्वागत करतात. असाच जल्लोष जिल्ह्यातील अजिंक्यतारा, प्रतापगड व किसन वीर कारखान्याच्या ऊस तोडणी मजूरांनी केला.
किसन वीर, प्रतापगड कारखाना कार्यक्षेत्रात कारखान्याकडे नोंदविण्यात आलेल्या संपूर्ण ऊसाची तोडणी झाली आहे. काही अडचणीमुळे थोड्या क्षेत्रातील ऊस शिल्लक राहिला आहे.
- विजय वाबळे,
कार्यकारी संचालक, किसन वीर कारखाना

 

Web Title: Eleven factories in the district have 'strapped'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.