पाटण तालुक्यात अकराशे वीज कनेक्शन्स तोडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:15 AM2021-03-04T05:15:01+5:302021-03-04T05:15:01+5:30
पाटण येथे पंचायत समितीची मासिक सभा बुधवारी सभापती राजाभाऊ शेलार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी विविध विषयांवर सविस्तर चर्चा ...
पाटण येथे पंचायत समितीची मासिक सभा बुधवारी सभापती राजाभाऊ शेलार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. बचत गटाच्या कार्यपद्धतीवरून सदस्य संतोष गिरी आणि सभापती राजाभाऊ शेलार या दोघांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. १ हजार १६४ बचत गटांपैकी फक्त अकरा बचत गट परिपूर्ण आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी सभेपुढे देताच, सदस्य संतोष गिरी यांनी जोरदार आक्षेप घेतला. बचत गटाचे कामकाज शून्य आहे, अशी टीका त्यांनी केली. तसेच शिंदेवाडी येथे बचत गटाचा झालेला कार्यक्रम राजकीय होता, असेही गिरी म्हणाले.
त्यावर सभापती राजाभाऊ शेलार यांनी, कोयना भागातील बचत गटांचे काम चांगले असल्याचे सांगितले. मात्र, सदस्य गिरी यांनी आक्षेप घेत, तुम्ही तालुक्याचे सभापती आहात, केवळ कोयना विभागाचे नव्हे, असे सुनावले. बराच वेळ खडाजंगी झाल्यानंतर सभेच्या शेवटी बचत गटावरील चर्चा अपुरीच राहिली.
तालुका कृषी विभागाचा आढावा देण्यासाठी सभेत कृषी सहायक आले होते. त्यावर राजाभाऊ शेलार जोरदार संतापले. तुम्ही काय आढावा देणार? तालुका कृषी अधिकारी आणि मंडल अधिकारी कुठे गेले? ग्रामसेवकांच्या संख्येएवढे कृषी सहायक असताना ते शेतकऱ्यांच्या बांधावर दिसत नाहीत. पुढच्या मासिक सभेत तालुका कृषी अधिकारी दिसले नाहीत तर कारवाई करू, असे सभापती शेलार यांनी बजावले.
प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये स्वीपर नाहीत. त्यामुळे स्वच्छतेची ऐशीतैशी झालेली आहे. प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांना अस्वच्छतेचा सामना करावा लागत आहे, असे सदस्य संतोष गिरी म्हणाले. फेब्रुवारी महिन्यात तालुक्यात चार लाख किलोमीटर अंतरावर एसटी फेऱ्या झाल्या असून त्यामुळे ९० लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले असल्याचे आगारप्रमुख निलेश उथळे यांनी सांगितले.
धामणी कोकिसरे आणि येथील पिण्याच्या पाण्याचे नमुने दूषित आल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तालुक्यातील ९१० शिक्षकांचे कोरोना लसीकरण करण्यात आले असून सध्या शाळाबाह्य विद्यार्थ्यांची शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. तसेच तालुक्यातील ८८ प्राथमिक शाळांच्या खोल्या धोकादायक असल्याचे उघड झाले आहे, अशी माहिती प्रभारी गटशिक्षणाधिकारी दीपाली बोरकर यांनी दिली.
- चौकट
केरळच्या अभ्यास दौऱ्यामुळे मोजकेच प्रभावित
पाटण पंचायत समितीचे सदस्य केरळ राज्याचा अभ्यास दौरा करून नुकतेच परत आले आहेत. त्यापैकी गटविकास अधिकारी मीना साळुंखे आणि सदस्या निर्मला देसाई हेच मासिक सभेत केरळ राज्यातील ग्रामपंचायतीचे कामकाज तसेच सौरऊर्जा प्रकल्प आणि इतर नावीन्यपूर्ण गोष्टी यावर बोलले. तसेच सभापती राजाभाऊ शेलार यांनीही काही किस्से सांगितले. मात्र केरळला गेलेल्या इतर सदस्यांनी आपल्या काही भावना व्यक्त केल्या नाहीत.
- चौकट
स्वच्छतागृहातील दुर्गंधीचा वास सभेत
पाटण पंचायत समितीत असलेले स्वच्छतागृह अत्यंत दुर्गंधीयुक्त आहे. येथे पाण्याची अत्यंत अपुरी व्यवस्था असल्यामुळे या स्वच्छतागृहातील दुर्गंधीचा वास मासिक सभेपर्यंत पोहोचला होता.
- चौकट
तंबाखू खाणाऱ्याला ठोठावला दंड
पाटण पंचायत समितीची मासिक सभा सुरू असताना पंचायत समितीत कामानिमित्त आलेला एकजण सर्वांसमक्ष हातावर तंबाखू घेऊन मळून खाण्याच्या तयारीत होता. तेवढ्यात सभापती राजाभाऊ शेलार आणि इतरांचे लक्ष गेले. त्याला मासिक सभेत बोलावून गटविकास अधिकारी मीना साळुंखे यांनी बाराशे रुपये दंड करण्याचे आदेश दिले.