फलटण तालुक्यात अकरा किलो गांजा जप्त
By admin | Published: March 6, 2015 11:41 PM2015-03-06T23:41:01+5:302015-03-06T23:44:01+5:30
सोलापूर जिल्ह्यातील दोघांना अटक
लोणंद : लोणंद-फलटण रस्त्यावर कापडगाव फाट्यावजळ कारमधून नेण्यात येणारा अकरा किलो चारशे ग्रॅम गांजा पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील दोघांना पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फलटण बाजूकडून लोणंदकडे एक कार येत आहे. त्यामध्ये दोघेजण असून, त्यांच्याकडे गांजा आहे. ते गांजा विक्रीसाठी निघाले आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुरुवारी रात्रीच्या सुमारास लोणंद पोलिसांनी पोलीस उपअधीक्षक हुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचला. त्यावेळी फलटण-लोणंद रस्त्यावर कापडगाव, ता. फलटणच्या हद्दीत कापडगाव फाट्याजवळ पोलिसांनी कार (एमएच ४५ ए ४७१४) अडविली. कारमध्ये तपासणी केली असता अकरा किलो चारशे ग्रॅम गांजा आढळून आला. पोलिसांनी गांजासह कार ताब्यात घेतली. या दोन्हीची किंमत सुमारे तीन लाख रुपये आहे.
याप्रकरणी पोलिसांनी लक्ष्मण रामू जाधव (वय ४२) आणि संतोष तुकाराम साळुंखे (वय ३०, दोघेही रा. पिलीव, ता. माळशिरस, जि. सोलापूर) यांना अटक केली. याप्रकरणी लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक अजित दळवी, पोलीस उपनिरीक्षक शैलेंद्र औटे, तृप्ती बोराटे, सहायक फौजदार जाधव, माने, हवालदार पवार, नेवसे, दिघे, महामूलकर, भिसे, देशमुख, वारागडे, काकडे यांनी कारवाईत भाग घेतला. (वार्ताहर)