जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी क्रांतीदिनी साताऱ्यात अकरा संघटनांचा एल्गार
By दीपक देशमुख | Published: August 9, 2023 03:22 PM2023-08-09T15:22:57+5:302023-08-09T16:13:53+5:30
साताऱ्यात बाईक रॅली, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
सातारा : जुन्या पेन्शनसह अनेक प्रलंबित मागण्यांसाठी संगठीत व असंगठीत क्षेत्रातील कामगारांच्या जिल्ह्यातील अकरा संघटनांनी एकत्र येवून साताऱ्यात बाईक रॅली काढली. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर आंदोलन करण्यात आले.
जुनी पेन्शन योजना देण्याचा शब्द मार्चला सात दिवसांच्या आंदोलनानंतर दिला होता. तो मुख्यमंत्र्यांनी पाळून तात्काळ अंमलबजावणी करावी, अशी मागणी करत जिल्ह्यातील अकरा संघटनांनी बाईक रॅली काढली. सातारा शहरातील क्रांती स्तंभ, हजेरी माळ येथून सुरू करून पोवई नाका, नगरपालिका, राजपथ, गांधी मैदान याच मार्गाने पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली नेण्यात आली. या रॅलीत १ हजार ८७५ दुचाकीवरून ३७०० जण तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ४ हजार ४८० आंदोलक सहभागी झाले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्वांनी जोरदार निदर्शने केली. यानंतर सर्व संघटनांच्या नेत्यांनी मार्गदर्शन करून शासनाने मागण्यांची पूर्तता करावी, अशी मागणी केली.
राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे गणेश देशमुख, समन्वय समितीचे अध्यक्ष नेताजी डिसले, किरण यादव, अस्लम तडसरकर, सोमनाथ बाबर, प्रमोद परमणे, आर. जी. तुपे, शशिकांत सुतार, माणिक अवघडे, शंकर पाटील, अरुण शेळके आदींच्या नेतृत्वाखाली हे आंदेालन करण्यात आले.