बेकायदा कर्जवसुली विरोधात एल्गार..!
By admin | Published: January 4, 2017 10:25 PM2017-01-04T22:25:39+5:302017-01-04T22:25:39+5:30
बचत गटांनाही कर्ज फेडीसाठी नव्वद दिवसांची मुदतवाढ द्यावी
कऱ्हाड : रिझर्व्ह बँकेने गृह, शेती व व्यावसायिक कर्ज भरण्यासाठी नव्वद दिवसांची मुदतवाढ दिली आहे. मात्र, बँका व मायक्रो फायनान्स कंपनींकडून हप्ते भरण्यासाठी महिला बचत गटांच्यामागे तगादा लावला आहे. त्यामुळे बचत गटांनाही कर्ज फेडीसाठी नव्वद दिवसांची मुदतवाढ द्यावी व संबंधित बँका व कंपनींना समज द्यावी, अशा मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कऱ्हाड उत्तरचे तालुकाध्यक्ष सचिन नलवडे यांच्या नेतृत्वाखाली कऱ्हाड तालुक्यातील शेकडो महिलांनी बुधवारी तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढला.
कऱ्हाड तालुक्यात सध्या मायक्रो फायनान्स कंपन्या तसेच बँकांकडून मोठ्या प्रमाणात महिला बचत गटांना कर्ज पुरवठा केला जात आहे. मात्र, त्याच्या हप्त्याची वसुली ही चुकीच्या पद्धतीने कर्मचाऱ्यांकडून केली जात असल्याने त्याचा नाहक त्रास बचत गटातील महिलांना होत आहे. याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना व शेकडो महिला यांनी आक्रोश मोर्चा काढला. यावेळी महिलांच्या वतीने तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
सचिन नलवडे म्हणाले, ‘मायक्रो फायनान्स कंपन्या या सावकारीचे दुसरे रूप आहे. या कंपन्या व बँकांवर शासनाने योग्य ती कारवाई केली पाहिले. ग्रामीण भागातील बचत गटांतील महिलांना स्वत:च्या फायद्यासाठी कर्जपुरवठा करून त्यांच्याकडून वाढीव व्याजदरासह पैशाची वसुली केली जात आहे. त्यामुळे महिलांना त्रास सहन करावा लागत आहे.
नोटाबंदीच्या निर्णयामुळे रिझर्व्ह बँकेने नुकतीच अधिसूचना जाहीर करून शेतकरी व्यावसायिकांना गृह, शेती व व्यावसायिक कर्ज भरण्यासाठी नव्वद दिवसांची मुदतवाढ दिली आहे. मात्र, त्यामध्ये महिला बचत गटांचा समावेश केलेला नाही. मायक्रो फायनान्स कंपनीकडून ग्रामीण भागातील महिला बचत गटातील महिलांना दिल्या जाणाऱ्या कर्जाचा व्याजदर हा सुमारे चोवीस टक्क्यांपर्यंत जातो. सध्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था कोलमडलेली आहे. त्याचा बचत गटातील महिलांच्या व्यवसायावरही परिणाम झाला आहे. कंपनी व बँकांचे हप्ते हे सात, पंधरा आणि वीस दिवसांप्रमाणे असतात. ते नोटाबंदीच्या निर्णयामुळे भरण्यास वेळ लागत असल्याने कंपनी व बँकेतील कर्मचारी महिलांना हप्ते भरण्याबाबत सतत मागणी करत असल्याने महिलांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.’
या मोर्चामध्ये कोपर्डे, मसूर व ओगलेवाडी परिसरातील बचत गटातील शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या.
यावेळी ओगलेवाडी येथील शालन लोंढे, बाबरमाची येथील मंदा सावंत या महिलांनीही आपली मनोगते व्यक्त केली. बचत गटातील महिलांनी काढलेला मोर्चा टाऊन हॉलमार्गे, बसस्थानक, दत्त चौक, भेदा चौक ते तहसील कार्यालय अशा मार्गे निघाला. यावेळी महिलांनी विविध घोषणा दिल्या. (प्रतिनिधी)