‘सह्याद्री’ विरोधात एल्गार !

By admin | Published: December 9, 2015 11:40 PM2015-12-09T23:40:02+5:302015-12-10T01:02:15+5:30

‘स्वाभिमानी’ संघटना आक्रमक : गत हंगामातील ९९ रुपयांचे देयबिल त्वरित द्या; सचिन नलवडे यांचा इशारा

Elgar against Sahyadri! | ‘सह्याद्री’ विरोधात एल्गार !

‘सह्याद्री’ विरोधात एल्गार !

Next

कऱ्हाड : ‘सह्याद्री सहकारी साखर कारखान्याने २०१३-१४ च्या गळीत हंगामातील देय असलेल्या फायनल बिलातील ९९ रुपये अद्यापही दिलेले नाहीत. ऊसउत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या संचालक मंडळाने हे बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर त्वरित जमा करावे. अन्यथा १३ डिसेंबरपासून कारखान्याविरोधात तीव्र आंदोलन उभे करू,’ असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन नलवडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.पत्रकात म्हटले आहे की, कायद्याप्रमाणे ऊस गेल्यानंतर चौदा दिवसांमध्ये ‘एफआरपी’प्रमाणे शेतकऱ्यांना उसाचे पैसे देणे कारखानदारांना बंधनकारक आहे. मात्र कारखानदार शेतकऱ्यांना व शासनाला साखरेच्या पडलेल्या बाजारभावाचा बागूलबुवा दाखवून ‘एफआरपी’ देणे शक्य नसल्याचे सांगत आहेत.
त्यांचे हे कारस्थान शेतकरी उलथून लावल्याखेरीज राहणार नाहीत.आज साखरेचा दर २६०० रुपयांच्या आसपास आहे. सातारा जिल्ह्यातील उसाची सरासरी रिकव्हरी ११.५० टक्के इतकी आहे. एक टन उसापासून कारखानदारांना ३१२० रुपयेची साखर मिळत आहे.तसेच मळी, बगॅस, इथेनॉल, डिस्लरी व को-जनरेशनद्वारे साखर कारखान्यांना सुमारे तीनशे रुपये जास्त उत्पन्न मिळतात. ५०० रुपये तोडणी वाहतूक खर्च वजा करता शेतकऱ्यांना ‘एफआरपी’प्रमाणे २४०० ते २७०० रुपयेपर्यंत रूक्कम देण्यास अडचण नाही. तसेच महाराष्ट्र शासनाने ऊसखरेदी कर माफ केल्याने ९० ते ११० रुपये कारखान्यांना जादा मिळतात.साखरेचे मूल्यांकन ८५ टक्यांवरून ९० टक्के केल्याने १४० रुपयेची जादा उचल कारखानदारांना मिळत आहे. तर साखर निर्यातीसाठी टनाला ४५ रुपये शासन देणार आहे. तरीही ‘एफआरपी’ द्यायला टाळाटाळ का? याचा जाब स्वाभिमानी शेतकरी विचारल्याशिवाय राहणार नाही.पत्रकावर दक्षिणचे तालुकाध्यक्ष देवानंद पाटील यांच्यासह दादासाहेब यादव, बापूसो साळुंखे, प्रदीप मोहिते, राजेंद्र पाटील, विकास हादगे, संदीप पवार, विकास पाटील, कृष्णत क्षीरसागर यांच्या सह्या आहेत. (प्रतिनिधी)


१३ डिसेंबरला रास्तारोको...
स्वाभिमानीचे खा. राजू शेट्टी व प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी साखर कारखानदारांना ‘एफआरपी’ प्रमाणे दर देण्यासाठी ५ डिसेंबरपर्यंत मुदत दिली होती. कारखानदारांनी ऊसगाळपाला सुरुवात करून महिना लोटला तरी ‘एफआरपी’ प्रमाणे ऊसदराचा पहिल्या हप्त्याचा पत्ता लागलेला नाही. त्यामुळे संघटनेच्या आदेशानुसार कऱ्हाड, पाटण तालुक्यात १३ डिसेंबरपासून रास्तारोको व ऊसतोड बंद आंदोलन करण्यात येणार आहे.

Web Title: Elgar against Sahyadri!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.