पार्थिवास रस्ता देण्यास लाजिरवाणा विरोध
By admin | Published: February 10, 2016 11:36 PM2016-02-10T23:36:06+5:302016-02-10T23:37:23+5:30
शहीद सूर्यवंशी : मस्करवाडीला करावी लागणार सुपुत्राची आणखी प्रतीक्षा
म्हसवड : सियाचीनमधील हिमस्खलनामुळे वीरमरण आलेले मस्करवाडी (ता. माण) येथील जवान सुनील विठ्ठल सूर्यवंशी यांच्या पार्थिवासाठी कुटुंबीय आणि ग्रामस्थांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. बदलत्या हवामानामुळे झालेल्या या विलंबाने ग्रामस्थांची घालमेल होत आहे; मात्र प्रतिकूल वातावरणात मायभूमीची सेवा करताना सर्वोच्च बलिदान देणाऱ्या या सुपुत्राच्या पार्थिवास रस्ता देण्यास शेतकऱ्याने विरोध केल्याची लाजिरवाणी घटना घडल्याने मस्करवाडीकरांच्या दुर्दैवात भर
पडली.सियाचीनमधील हवामान बदलल्याने पार्थिव आणण्यास आणखी दोन दिवस लागणार असल्याची माहिती सूर्यवंशी यांचे ज्येष्ठ बंधू तानाजी सूर्यवंशी यांनी दिली. ते लष्करी अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. गुरुवारी सायंकाळपर्यंत पार्थिव साताऱ्यात आणले जाण्याची शक्यता आहे. सियाचीनमधील हवामान अचानक बदलल्याने पार्थिव आणण्यास विलंब होत असून, ग्रामस्थ आणि सूर्यवंशी कुटुंबीयांची घालमेल होत आहे.दरम्यान, मस्करवाडी गावच्या सीमेवरील दोन शेतकऱ्यांचा रस्त्यावरून अनेक वर्षांचा वाद आहे. पार्थिव आणण्यासाठी रस्ता रुंद करावा लागणार असून, त्यास एका शेतकऱ्याने हरकत घेतल्याने पार्थिवाचीही वाट बिकट झाली. हा रस्ता दोन्ही शेतकऱ्यांच्या जमिनींच्या हद्दीमधून जातो. हद्दीवरून दोघांचा वाद अनेक वर्षे सुरू आहे. बुधवारी रस्ता मोठा करण्यासाठी जेसीबी पाठविण्यात आला, त्यावेळी एका शेतकऱ्याने जेसीबीच्या दिशेने दगड भिरकावल्याने मस्क
रवाडीतील वातावरण गंभीर बनले.
देशासाठी प्राण देणाऱ्या सुपुत्राला रस्ताही न देण्याचा लाजिरवाणा प्रकार प्रथमच घडत असावा. संबंधित शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये खडाजंगी सुरू असताना जिल्हा परिषद सदस्य दिलीप तुपे यांनी शिष्टाई करून सर्वांना प्रसंगाचे गांभीर्य राखण्याची विनंती केली.
सुनील सूर्यवंशी शहीद झाल्याचे जाहीर होताच सैनिक स्कूलच्या अधिकाऱ्यांनी अंत्यविधीच्या जागेची पाहणी केली. त्या जागेची ग्रामपंचायतीकडून सफाई सुरू आहे. सुनील यांच्या मातोश्री आणि पत्नी यांना दुर्घटनेबाबत माहिती देण्यात आली नसल्याचे तानाजी सूर्यवंशी यांनी सांगितले. गावच्या सुुपुत्राचे अंत्यदर्शन लवकर व्हावे यासाठी ग्रामस्थ आतुरले आहेत. (प्रतिनिधी)
प्रशासनालाही नाही गांभीर्य
मस्करवाडीचा सुपुत्र देशाच्या सुरक्षेसाठी शहीद झाला असतानाच महसूल यंत्रणा, बांधकाम विभाग, पोलीस यंत्रणा यापैकी कोणत्याही विभागाचे अधिकारी बुधवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत मस्करवाडीत फिरकलेच नव्हते. जवानाच्या बलिदानाचे प्रशासनाला गांभीर्य आहे की नाही, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला. प्रशासकीय यंत्रणेने अंत्यविधीची तयारी कुकुडवाड ग्रामपंचायतीकडे दिली आहे. ग्रामपंचायतीचे प्रयत्न अपुरे पडत असून, रस्ता दुरुस्त करण्यासारखी कामे बांधकाम विभागाची असताना या विभागाचे कोणीही गावाकडे फिरकले नाही. संपूर्ण गाव या घटनेने सुन्न झाले असताना प्रशासकीय यंत्रणा मात्र झोपी गेल्याचे दिसून येत आहे.
तनयाचे रडणे असह्य
सुनील सूर्यवंशी यांची एक वर्षाची मुलगी तनया बुधवारी दिवसभर रडत होती. लहान मूल वारंवार रडत असले, तरी तनयाचे आजचे रडणे ग्रामस्थांना असह्य होत होते. तिला तिच्या पित्याची आठवण तर येत नसेल ना, असे भावनिक होऊन बोलले जात होते.