प्रश्नांचा भडीमार झाल्याने अधिकाऱ्यांची तंतरली!

By admin | Published: September 3, 2016 11:50 PM2016-09-03T23:50:22+5:302016-09-04T00:34:01+5:30

कऱ्हाडला आमसभा : ग्रामस्थांनी मांडल्या गावच्या समस्या; लोकप्रतिनिधींकडून अधिकारी धारेवर

Embarrassed by the questions of the officials tantrik! | प्रश्नांचा भडीमार झाल्याने अधिकाऱ्यांची तंतरली!

प्रश्नांचा भडीमार झाल्याने अधिकाऱ्यांची तंतरली!

Next

कऱ्हाड : तालुक्यातील अनेक गावांतील गावठाणांचे प्रलंबित प्रश्न, बेकायदेशीरपणे करण्यात आलेले अतिक्रमण, कऱ्हाड-ओगलेवाडी, विद्यानगर या रस्त्यांचे झालेले निकृष्ट काम तसेच शेताच्या बांधांचे प्रश्न याकडे शासकीय अधिकाऱ्यांकडून करण्यात आलेले दुर्लक्ष अशा एक ना अनेक तक्रारी ग्रामस्थांनी मांडल्या. यावेळी ग्रामस्थांसह लोकप्रतिनिधींनीही अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
कऱ्हाडमध्ये शनिवारी यशवंतराव चव्हाण सभागृहात शनिवारी आमसभा पार पडली. त्यावेळी अधिकाऱ्यांविरोधात मोठ्या प्रमाणावर तक्रारी करण्यात आल्या. संतापलेल्या नागरिक व ग्रामस्थांनी शासकीय विभागाविषयी इतक्या प्रचंड संख्येने समस्या आणि गाऱ्हाणी मांडली की, सभेस उपस्थित माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह आमदार शंभूराज देसाई, आमदार आनंदराव पाटील चकीत झाले. तब्बल पाच तास चाललेल्या या आमसभेत सर्वसामान्य जनतेच्या प्रतिनिधींनी अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या चुकीच्या कामांचा पाढा वाचला. सभेच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते. यावेळी प्रांताधिकारी किशोर पवार, तहसीलदार राजेंद्र शेळके, जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती डॉ. सुरेखा शेवाळे, जिल्हा परिषद सदस्या विजयमाला जगदाळे, पंचायत समिती सभापती देवराज पाटील आदींसह पंचायत समिती सदस्य उपस्थित होते.
गटविकास अधिकारी अविनाश फडतरे यांनी २०१५ मध्ये झालेल्या सभेचा वृत्तांत वाचून दाखविला. त्यानंतर पंचायत समितीच्या विविध विभागांचा आढावा घेण्यात आला. यावेळी तालुका कृषी अधिकारी पाटील यांनी जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या कामांची माहिती दिली. दरम्यान, शामगावच्या उपसरपंचांनी शामगाव येथे जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या तलावर बांधकामाचे काम पूर्ण झाले नसल्याचे सांगितले. तसेच योजना गावपातळीवर राबवत असताना स्थानिक लोकप्रतिनिधींना अधिकाऱ्यांकडून सर्व माहिती देऊनच ती राबवावी, अशी मागणी केली. यावेळी तहसीलदार राजेंद्र शेळके यांनी याबाबत योजना राबविण्यात येत असलेल्या ग्रामस्थांची मीटिंग घेण्यात येईल, असे सांगितले.
तालुक्यात करण्यात आलेल्या दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांचा सर्व्हे हा चुकीचा असल्याचे अप्पासाहेब गायकवाड यांनी सांगितले. तसेच पुन्हा यादी तयार करण्यात यावी, अशी मागणी केली. तर कार्वे येथील तंटामुक्ती अध्यक्ष मारुती जाधव यांनी कार्वे येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येईल, असे सांगितले.
यावेळी प्रशांत यादव यांनी शासनाने मंजूर केलेल्या कऱ्हाड-चिपळूण रेल्वे मार्गामुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत. जमिनी संपादित करताना शासनाकडून त्याचा मोबदला नक्की किती दिला जाणार, याबाबत त्यांच्यात सध्या चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे याची माहिती घेणे गरजेचे असल्याचे सांगत कऱ्हाड-विटा मार्गावर ओगलेवाडी ते कृष्णा कॅनॉलपर्यंतच्या कामात अनेक त्रुटी आहेत. ठेकेदाराकडून रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आले आहे. याबाबत संबंधित बांधकाम विभागाचे अधिकारी व ठेकेदार यांच्याकडून काहीच उपाययोजना राबविल्या जात नाहीत. त्यामुळे या रस्ता कामाचा ठेकेदार तत्काळ बदलण्यात यावा, अशी मागणी यादव यांनी केली. तर सैदापूर येथील मोहन जाधव म्हणाले, ‘बनवडी, विद्यानगर येथील रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. दुसरीकडे सैदापूर येथील जुन्या ब्रिटिशकालीन कॅनॉलमधून दुर्गंधीयुक्त बाहेर पडणाऱ्या पाण्यामुळे स्थानिक गरीब लोकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. शिवाय सैदापूर येथील ग्रामपंचायतीकडून कृष्णा नदीपात्रात कचरा टाकल्याने नदीप्रदूषणही होत आहे,’ असे सांगितले. त्यावर माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकामांच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले व याबाबत उच्चस्तरीय चौकशी करून मार्ग काढू, असे सांगितले.
आ. पृथ्वीराज चव्हाण, शंभूराज देसाई व आनंदराव पाटील यांनी तक्रारींचे निवारणाबाबत लोकांना आश्वासने दिली; परंतु तक्रारींची संख्या वाढतच गेल्यामुळे अनेकांना त्यांचे म्हणणे अखेर निवेदनाच्या स्वरूपातच मांडावे लागले. (प्रतिनिधी)

Web Title: Embarrassed by the questions of the officials tantrik!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.