विद्यार्थ्यांच्या शिकवणी शुल्कात दीड कोटींचा अपहार, संस्थेतील कर्मचाऱ्यावर गुन्हा नोंद; साताऱ्यातील प्रकार
By नितीन काळेल | Published: August 17, 2023 12:46 PM2023-08-17T12:46:00+5:302023-08-17T12:46:53+5:30
सातारा : साताऱ्यातील आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये काम करणाऱ्यानेच विद्यार्थ्यांच्या शिकवणीचे शुल्क परस्पर दुसऱ्याच्या नावावर वळते करुन १ कोटी ६८ ...
सातारा : साताऱ्यातील आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये काम करणाऱ्यानेच विद्यार्थ्यांच्या शिकवणीचे शुल्क परस्पर दुसऱ्याच्या नावावर वळते करुन १ कोटी ६८ लाख रुपयांचा अपहार केला. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात पुणे जिल्ह्यातील कर्मचाऱ्यावर अपहाराचा गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी नवनाथ बाळासो देशमुख (रा. शिवराज काॅलनी, देगाव फाटा सातारा) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार गजानन दत्तात्रय गोरे (रा. तळेगाव दाभाडे पुणे) याच्याविरोधात गुन्हा नोंद झालेला आहे. पोलिसांनी सांगितले की, सातारा शहराजवळ तक्रारदार नवनाथ देशमुख यांचे आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे. यामध्ये पगारावर संशयित गजानन गोरे काम करत होता. या इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून शिकवणी शुल्क घेण्यात येत होते. याचा हिशोब गोरे याला मागण्यात आला.
पण, त्याने तक्रादार देशमुख यांना चुकीची उत्तरे दिली. तसेच १ कोटी ६८ लाख रुपयांची रक्कम त्याने वडील दत्तात्रय गोरे, पत्नी प्रियंका गोरे आणि कार्यालयातील दीपक सूर्यवंशी आणि प्रीती चव्हाण (पूर्ण नाव पत्ता नाही) यांच्या खात्यावर वळती केली. तसेच बनावट बिलबूक तयार करुन रोख स्वरुपात रक्कम घेऊन त्याचा अपहार करण्यात आला, अशी तक्रार देण्यात आलेली आहे. सातारा शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीसह अपहाराचा गुन्हा नोंद झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक मोरे हे तपास करीत आहेत.