धास्तावल्या विद्यार्थ्यांना ‘लिफ्ट’ची उभारी

By admin | Published: March 3, 2015 10:05 PM2015-03-03T22:05:13+5:302015-03-03T22:46:32+5:30

दहावी परीक्षेचा पहिला दिवस : केंद्रावर वेळेत पोहोचविण्यासाठी परीक्षार्थींना सातारकरांचा मदतीचा हात--लोकमत इनिशिएटिव्ह

Emergency students raised 'lift' | धास्तावल्या विद्यार्थ्यांना ‘लिफ्ट’ची उभारी

धास्तावल्या विद्यार्थ्यांना ‘लिफ्ट’ची उभारी

Next

सातारा : कधी नव्हे ते गावाकडच्या बसथांबे गर्दीने ओसंडलेले होते. साडेदहाची वेळ गाठण्याचं टेन्शन सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होतं. अशा वेळी परीक्षेच्या टेन्शनने धास्तावलेल्या विद्यार्थ्यांना ‘लोकमत’नं ‘लिफ्ट’ देऊन त्यांना परीक्षा केंद्रापर्यंत सुखरूप पोहोचविण्याची जबाबदारी पार पाडली. ‘लोकमत’नं केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सातारकरांनीही परीक्षार्थींना वाहनातून परीक्षा केंद्रांवर सोडले.आज (दि. ०३) दहावीचा पहिला पेपर. विद्यार्थ्यांसह पालकांचीही भलतीच धांदल उडाली होती. परीक्षेचे साहित्य बरोबर घेतलंय ना, बस लवकर मिळेल ना, वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचता येईल ना, अशा अनेक प्रश्नांचं ओझं डोक्यावर घेऊनच अनेकांना सकाळी घर सोडलेलं अन् बसस्टॉप गाठलेले. ग्रामीण भागात शिकणारे हजारो विद्यार्थी आज दहावीच्या परीक्षा देण्यासाठी परगावी जाणार होते. एसटी बस, वडाप वेळेवर मिळेलच याची शाश्वती नाही, यासाठी नागरिकांनी आपल्या दुचाकी अथवा चारचाकी वाहनातून परीक्षार्थींना ‘लिफ्ट’ द्यावी, असे आवाहन ‘लोकमत’तर्फे करण्यात आले होते. इतरांना नुसते आवाहनच न करता बुधवारी ‘लोकमत’च्या कर्मचाऱ्यांनी याची स्वत:पासून सुरुवात केली अन् अनेक विद्यार्थ्यांना दुचाकीवरून परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचविले.वाढे फाटा येथे सकाळी परीक्षार्थी वाहनाची वाट पाहत उभे होते. मात्र, वाहन मिळत नव्हते. अशा वेळी ‘लोकमत’च्या कर्मचाऱ्यांनी मुलांना आपल्या दुचाकीवरून शहरातील सयाजी विद्यालय, अनंत इंग्लिश स्कूल अशा विविध परीक्षा केंद्रांवर पोहोचविण्याचे काम केले. परीक्षेची वेळ अकराची असल्यामुळे शहरातील विद्यार्थी चालत निघाले असताना उशीर झाल्यामुळे येणार-जाणाऱ्या वाहनांना हात करत होते. अशा धास्तावलेल्या अनेक विद्यार्थ्यांना ‘लोकमत’च्या टीमने परीक्षा केंद्रांवर पोहोचविण्याचे काम केले. (प्रतिनिधी)

बैठक क्रमांक शोधण्यातही मदत
धास्तावलेल्या विद्यार्थ्यांना ‘लिफ्ट’ देऊन आपल्या दुचाकीवरून परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचविण्याबरोबरच ‘लोकमत’च्या कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना बैठक क्रमांक शोधण्यातही मदत केली. शिवाय परीक्षेसाठी आवश्यक सर्व साहित्य बरोबर आणले आहे का, याची विचारपूस करून मनोधैर्य वाढविले, अशा भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.


पहिलाच पेपर असल्यामुळे परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचता येईल की नाही, या धास्ती होती. वाडेफाट्यावर वाहनाची वाट पाहत उभे असताना ‘लोकमत’च्या कर्मचाऱ्यानं ‘लिफ्ट’ दिली. आणि मला सयाजीराव विद्यालयाजवळ वेळेत पोहोचविले. वेळेपूर्वी पोहोचल्यामुळं मला नंबर कुठं आलाय हे पाहता आलं.
- रोहन वाघ, विद्याथी


घरातून निघायला थोडा उशीर झाल्यामुळं खूप टेन्शन आलं होतं. समर्थ कॉलनी (वाडेफाटा) येथे वाहनाची वाट पाहत होतो. त्यावेळी ‘लोकमत’च्या कर्मचाऱ्यानं मला दुचाकीवर बसवून परीक्षा केंद्रावर पोहोचविले. वेळेत पोहोचल्यामुळं खूप ‘रिलॅक्स’ झालो. ‘लोकमत’ला धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत.
- प्रसाद यादव, विद्यार्थी

Web Title: Emergency students raised 'lift'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.