मोहनराव कदमांच्या भेटीने कार्यकर्ते भावूक

By admin | Published: November 14, 2016 11:44 PM2016-11-14T23:44:40+5:302016-11-15T00:26:42+5:30

कवठेमहांकाळला बैठक : विधानपरिषद निवडणूक

Emotional meeting with the meeting of Mohanrao Kadam | मोहनराव कदमांच्या भेटीने कार्यकर्ते भावूक

मोहनराव कदमांच्या भेटीने कार्यकर्ते भावूक

Next

अर्जुन कर्पे -- कवठेमहांकाळ -वेळ सायंकाळी साडेपाचची. कवठ्यात नगरपंचायतीचे वारे वाहू लागले असताना, जुन्या बसस्थानकावरून माणसांची ये-जा सुरू होती. काँग्रेसचे उमेदवारही दिवसभराचा प्रचार आटोपून काँग्रेस भवनात मतांची आकडेमोड करीत बसले होते. याचवेळी ज्येष्ठ नेते मोहनराव (दादा) कदम यांनी काँग्रेस भवनमध्ये अचानक प्रवेश केला आणि सगळेच अवाक् झाले.
दादा आले आणि त्यावेळी बैठकीत रूपांतर कधी झाले, हे समजलेच नाही. बघता-बघता शेकडो कार्यकर्ते जमा झाले आणि दादांनी जुन्या आठवणींना उजाळा देण्यास सुरुवात केली. ‘हे बघा पोरांनो, मी राजकारणातील एक राजकीय मूर्तिकार म्हणून खूप मोठी भूमिका पार पाडली आहे. या राजकारणात अनेक आमदार, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, महापौर, सभापती, अध्यक्ष, राजकारणातील अनेक मातब्बर कार्यकर्ते, नेते घडविले आणि यात किती व कसा वेळ गेला समजलेच नाही. काम करीत राहिलो. खूप काम केले. काँग्रेस पक्षाने जी जी जबाबदारी आजवर दिली, ती इमानेइतबारे पार पाडली. पण राजकारणातील रंगमंचावर मात्र मी उपेक्षितच राहिलोय रे! उपेक्षित हे समजायला अख्खे आयुष्य वेचावे लागले रे...’, असे म्हणत दादा खूपच भावूक झाले. त्यांच्या डोळ्यात अश्रू जमा झाले आणि उपस्थित सर्वच शांत झाले.
परत दादांनीच सर्वांना सावरत, ‘चालायचं राजकारणात’, म्हणत, ‘आपलं काम आहे जनतेची सेवा करायचं, ते करत राहायचं,’ म्हणत सुस्कारा सोडला. ‘बघू, आता माझी वेळ आली आहे. विधानपरिषदेसाठी सांगली, सातारामधून चांगला प्रतिसाद मिळतोय. माझ्यासारखा माणूस सर्वांना पाहिजे, अशी मतदारांची मागणी आहे. आजवर केलेल्या कामाची पोहोचपावती हे मतदार नक्की देतील. पक्ष बघणार नाहीत, माणूस बघतील’, असा विश्वासही दादांनी भावूक स्वरात व्यक्त केला. ‘सर्वत्र मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. सगळ्यांनी मदत करण्याचं ठरवलं आहे. आजवर हा मोहनराव कदम सगळ्यांसाठी आधार झाला आहे. आता माझ्या लढाईत कोण-कोण साथ आणि सोबत राहतंय बघुया,’ असे सांगायला दादा विसरले नाहीत. जाता-जाता ते सगळ्यांनाच भावूक करून गेले.
दादा असे सांगत असताना उपस्थित सर्वजण शांतपणे ऐकत होते. शेवटी दादांनीच निघण्याची परवानगी मागितली व त्यांच्या गाड्या सांगलीच्या दिशेने रवाना झाल्या.
मोहनराव दादा गेल्यानंतर काँग्रेसची सर्वच मंडळी आणि उपस्थित कुजबुजू लागली. राजकारणात असा उदार मनाचा, खुल्या अंत:करणाचा माणूस होणार नाही. असा माणूस नक्कीच निवडून येईल, असा बोलबाला करीत सगळेजण परत प्रचाराला निघून गेले.
यावेळी आप्पासाहेब शिंदे, सुरेश मोहिते, सतीश पाटील, बाळासाहेब गुरव, राजाराम घोरपडे, वैभव गुरव, दिलीप पाटील, चैतन्य पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.


‘ कवठेमहांकाळ तालुका : माझे व्यक्तिगत संबंध
कवठेमहांकाळ तालुक्याशी माझी पूर्वीपासून राजकीय, सामाजिक नाळ जोडली गेली आहे. माझे व्यक्तिगत संबंध आहेत. त्यामुळे मला कवठेमहांकाळ तालुक्यातून नक्की मतदार न्याय देतील. मी आजवरच्या माझ्या राजकीय प्रवासात काम करीत असताना, माझ्याकडे काम घेऊन येणाऱ्या कार्यकर्त्यांचा तसेच मदत मागणाऱ्या नेत्यांचा पक्ष बघितला नाही. येणाऱ्या कार्यकर्त्यांची प्रामाणिकपणे कामे केली. नेत्यांनाही मदत केल्यामुळे या विधानपरिषदेच्या निवडणुकीत ही सर्व माणसे, नेते, कार्यकर्ते, मतदार माझ्या पाठीशी ढाल बनून थांबतील, असा विश्वास आहे’, असेही दादांनी सांगितले.

Web Title: Emotional meeting with the meeting of Mohanrao Kadam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.