जावळीत डिजिटल प्रचारावर जोर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:42 AM2021-01-13T05:42:09+5:302021-01-13T05:42:09+5:30
कुडाळ : जावळी तालुक्यातील विविध गावांमध्ये सध्या ग्रामपंचायत निवडणुकीचे धुमशान सुरू आहे. तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतींपैकी ३७ ग्रामपंचायती बिनविरोध झालेल्या ...
कुडाळ : जावळी तालुक्यातील विविध गावांमध्ये सध्या ग्रामपंचायत निवडणुकीचे धुमशान सुरू आहे. तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतींपैकी ३७ ग्रामपंचायती बिनविरोध झालेल्या असून, उर्वरित ठिकाणी प्रचाराचा जोर वाढला आहे. डिजिटल माध्यमातून उमेदवार आपली भूमिका मतदारांपुढे मांडताना दिसत आहेत.
तालुक्यात अनेक ठिकाणी युवा वर्ग निवडणूक रिंगणात उतरल्याचे पाहायला मिळत असून, मोठ्या गावांमध्ये मात्र पारंपरिक गटामध्येच अटीतटीची लढाई रंगणार असल्याचे चित्र आहे. पश्चिम विभागाने मात्र बऱ्याच ग्रामपंचायती बिनविरोध ठेवण्याची परंपरा कायम राखली आहे. तालुक्यातील ७२ प्रभागांतून २४२ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. काही ठिकाणी ज्येष्ठ फळीतीलच उमेदवार पुन्हा एकदा दंड थोपटून निवडणुकीसाठी सामोरे जात असल्याचे दिसत आहे.
गेल्या आठ-दहा महिन्यांत कोरोनामुळे शांत असलेले वातावरण आता प्रचाराच्या रणधुमाळीने चांगलेच ढवळून निघाले आहे. निवडणुकीचा प्रचार सध्या रंगात आला असून, गावोगाव उमेदवार मतदारांच्या गाठीभेटीमध्ये व्यस्त आहेत. बदलत्या काळानुरूप प्रचाराची पद्धतीही बदलली आहे. गावात आपापल्या वॉर्डात उमेदवारांचे डिजिटल फलक झळकलेले दिसत आहेत. उमेदवार सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून प्रचार यंत्रणा राबवत आहेत. यामुळे विविध ग्रुपच्या माध्यमातून वाॅर्डात, गावात तसेच गावाबाहेर असणाऱ्यांशी संपर्क साधला जात आहे. मोठ्या गावांमध्ये विविध पॅनेल आपल्या ध्वनिफितीतून गावाच्या विकासाची योजना मतदारांसमोर मांडत आहेत. यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरेपूर उपयोग होत ग्रामपंचायत निवडणुकीत डिजिटल प्रचारच सगळीकडे पाहायला मिळत आहे.