विकासकामे पूर्ण करण्यावर भर द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:46 AM2021-09-24T04:46:11+5:302021-09-24T04:46:11+5:30
सातारा : ‘कोरोना संकटामुळे कामांवर परिणाम झाला आहे. पण, आता आर्थिक वर्ष संपण्यासाठी काही महिनेच शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे ...
सातारा : ‘कोरोना संकटामुळे कामांवर परिणाम झाला आहे. पण, आता आर्थिक वर्ष संपण्यासाठी काही महिनेच शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांनी विकासकामे मार्गी लावून ती पूर्ण करण्यावर भर द्यावा,’ अशी स्पष्ट सूचना जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले यांनी केली.
जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात जलव्यवस्थापन आणि स्थायी समितीची सभा अध्यक्ष उदय कबुले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी कबुले यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन सूचना केली. या सभेला मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, ग्रामपंचायत विभागाच्या अर्चना वाघमळे, पाणी व स्वच्छता विभागाचे किरण सायमोते, महिला व बालकल्याणच्या रोहिणी ढवळे, अर्थ व शिक्षण समिती सभापती मानसिंगराव जगदाळे, कृषी समितीचे सभापती मंगेश धुमाळ, समाजकल्याण समिती सभापती कल्पना खाडे, समितींचे सदस्य भीमराव पाटील, दीपक पवार, शिवाजी सर्वगोड, जयवंत भोसले, सागर शिवदास, सुवर्णा देसाई आदींसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, या सभेत विविध विषयांवर चर्चा झाली. तसेच काही ठरावही करण्यात आले.
सुरुवातीला जलव्यवस्थापन समितीची सभा झाली. या सभेत जिल्ह्यातील तलाव, बंधाऱ्यांचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर स्थायी समितीची सभा झाली. या सभेत प्रथम मागील सभेचा कार्यवृत्तांत वाचून कायम करण्यात आला. तसेच मागील ठरावावरील कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला.
या सभेत माण पंचायत समितीने तेथील सभागृहाला दिवंगत आमदार सदाशिवराव पोळ यांचे नाव देण्याचा ठराव केल्याचा विषय चर्चेला आला. यावर जिल्हा परिषदेने माण पंचायत समिती सभागृहाला पोळ यांचे नाव देण्याचा ठराव घेऊन तो राज्य शासनाकडे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच या सभेत विविध विभागांचाही आढावा घेण्यात आला.
.................................................