औद्योगिक वसाहतीमध्ये कचऱ्याचे साम्राज्य!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:29 AM2021-07-17T04:29:43+5:302021-07-17T04:29:43+5:30
करंजे : सातारा शहराजवळील औद्योगिक वसाहतीत बऱ्याच ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. ...
करंजे : सातारा शहराजवळील औद्योगिक वसाहतीत बऱ्याच ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
सातारा येथील नवीन औद्योगिक क्षेत्रात येणाऱ्या बऱ्याच भागात कचऱ्याचा प्रश्न सतावत आहे. नवीन औद्योगिक क्षेत्रातील असणाऱ्या पुलावर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात घरगुती कचरा, हॉटेलमधील खरकटे या पुलाच्या दोन्ही बाजूला टाकला आहे. या परिसरात दुर्गंधी पसरली असून, रस्त्यावरून जाणाऱ्या औद्योगिक वसाहतीमधील कर्मचाऱ्यांना व स्थानिकांना याचा त्रास होऊ लागला आहे. तसेच या पुलाखालून वाहणारे पाणी दूषित झाले असून, जलचर प्राण्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.
एकीकडे कोरोनाने लोकांचे कंबरडे मोडले असून, आता या ठिकाणी दूषित वातावरणामुळे नागरिकांना दुसऱ्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. या ठिकाणी हॉटेल व खरकटे अन्न् टाकल्यामुळे भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. नागरिक या ठिकाणाहून चालत जाताना जीव मुठीत धरून जात आहेत. वाहनचालकही या कुत्र्यांमुळे त्रस्त झाले आहेत. बऱ्याच वेळा या ठिकाणी कुत्री पळत वाहनासमोर येतात. त्यामुळे वाहनांवरून पडून अपघात झाले आहेत. औद्योगिक वसाहतीमधील कचऱ्याचे कचरा व्यवस्थापन मंडळाने हटवून चाकरमान्यांच्या व येथील स्थानिकांच्या आरोग्याचा प्रश्न लवकर मार्गी लावावा, अशी मागणी येथे नागरिकांमधून होत आहे.