लाचखोर तलाठ्याला सक्तमजुरी
By admin | Published: September 15, 2015 11:53 PM2015-09-15T23:53:29+5:302015-09-15T23:54:30+5:30
सातबारा फेरफार : दोन वर्षे शिक्षा
सातारा : खरेदी दस्ताप्रमाणे नोंदी करणे, सातबारा आणि फेरफार उतारा देण्यासाठी १३ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात सापडलेल्या शिरवळच्या तलाठ्याला येथील न्यायालयाने दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. आरोपीला दोन कलमान्वये अनुक्रमे दोन हजार आणि पाच हजार दंडही भरावा लागणार असून, दंड न दिल्यास अनुक्रमे तीन महिने आणि सहा महिने सक्तमजुरी भोगावी लागणार आहे.
शिवाजीराव आनंदराव पवार (वय ५५, रा. ज्ञानेश्वरनगर, शकुंतला अपार्टमेन्ट, कर्वे पुलाजवळ, कोथरूड-पुणे) असे तलाठ्याचे नाव आहे. खरेदी दस्ताची नोंद करून सातबारा व फेरफार उतारा देण्यासाठी त्याने १३ हजार रुपयांची लाच मागितली होती. ती घेताना
दि. १५ मे २०१२ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या निरीक्षक वैशाली पाटील यांच्यासह कर्मचाऱ्यांनी सापळा रचून रंगेहात पकडले होते आणि खंडाळा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. पाटील यांनीच तपास करून पवार याच्याविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.
याप्रकरणी पाच साक्षीदार तपासण्यात आले. सर्व साक्षीपुरावे विचारात घेऊन विशेष जिल्हा सत्र न्यायाधीश ए. एन. पाटील यांनी लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या विविध दोन कलमांखाली आरोपीला अनुक्रमे एक व दोन वर्षे अशी एकंदर तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. (प्रतिनिधी)