निवडणुका घ्यायला कर्मचारी मिळतायत, प्रकल्पग्रस्तांना जमिनी वाटपाला नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:40 AM2021-05-18T04:40:52+5:302021-05-18T04:40:52+5:30
सातारा : कोरोनाच्या महामारीमुळे कोयना धरणग्रस्तांचे संकलन रजिस्टर पूर्ण करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेले १ मे रोजी वाटप ...
सातारा : कोरोनाच्या महामारीमुळे कोयना धरणग्रस्तांचे संकलन रजिस्टर पूर्ण करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेले १ मे रोजी वाटप सुरू करण्याचे निर्देश पाळता येत नाहीत तर निवडणुका कशा काय घेतल्या जातात आणि यासाठी मनुष्यबळ कोठून व कसे आणले जाणार, असा सवाल डॉ. भारत पाटणकर यांनी जिल्हा प्रशासनासमोर उभा केला आहे.
६०-६५ वर्षे उद्ध्वस्त केलेल्या कोयना धरणग्रस्तांनी लढून मिळवलेला विकसनशील पुनर्वसनाचा हक्क कोरोना महामारीच्या कारणाने अनिश्चित काळापर्यंत बंद ठेवला जात आहे. कर्मचारी नाहीत म्हणून सांगितले जात आहे. मग कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीला कर्मचारी कसे काय उपलब्ध होणार आहेत. जर उपलब्ध होणारच असतील तर कोरोना महामारीचे काय असा सवाल प्रकल्पग्रस्त जनता विचारत आहे, असे डॉ. भारत पाटणकर यांनी सांगितले आहे.
सातारा जिल्हाधिकारी यांनी ही कृष्णा कारखान्याची निवडणूक रद्द करावी यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा. आणि मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनाही आमचा सवाल आहे, असेही डॉ. भारत पाटणकर यांनी सांगितले.
खरे तर प्रकल्पग्रस्तांचे काम करणे हे कार्यालयात बसून गर्दी न करता करण्याचे काम आहे, यासाठी बाहेरून लोक किंवा कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात यावे लागणार नाहीत, असे असताना कोरोनाचे कारण देऊन हे काम थांबवले जाते, व दुसऱ्या बाजूला मात्र कृष्णा कारखान्याची निवडणूक जाहीर करून ती घेण्याचा घाट घातला जातो हे कशाचे द्योतक आहे. या निवडणुकीत सभा होणार, मिरवणूक निघणार, पर्यायाने गर्दी होणार याला मात्र कोरोनाचे नियम लागू नाहीत, यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही. आणि प्रकल्पग्रस्तांचे काम करताना कोरोना आढवा येतो याचे लॉजिक जनतेला समजले नाही, असेही डॉ. भारत पाटणकर यांनी सांगितले.
तुझे आम्हाला पत्र दिले तसे निवडणूक रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे का?
कोयना धरणग्रस्तांचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या बैठकीत दिलेले निर्देश पाळले जात नाहीत म्हणून कोयना धरणग्रस्त आपल्या गावागावात बेमुदत आंदोलन सुरु केले. त्याबाबतीत जिल्हाधिकारी यांनी कोरोना महामारीच्या कारणामुळे आंदोलनापासून परावृत्त व्हावे, व प्रशासनाला सहकार्य करावे, असे पत्र आम्हाला दिले आहे. मग या निवडणुकीबाबत हे प्रशासन शासनाला पत्र लिहून निवडणूक पुढे ढकलण्याविषयी काही हालचाल केली आहे का? असाही सवाल डॉ. भारत पाटणकर यांनी व्यक्त केला आहे.