देवळीमुरा गावात बिबट्यासाठी कर्मचारी पिंजºयात,बंद घरात थरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 12:08 AM2017-11-21T00:08:06+5:302017-11-21T00:10:13+5:30
महाबळेश्वर : तालुक्यातील देवळीमुरा या गावात रविवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास एक बिबट्या थेट घरात शिरला.
महाबळेश्वर : तालुक्यातील देवळीमुरा या गावात रविवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास एक बिबट्या थेट घरात शिरला. ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखून घराला कडी लावल्याने बिबट्या घरातच कोंडून राहिला. मात्र, त्याला बाहेर काढण्यासाठी वनविभागाच्या कर्मचाºयांनी स्वत:ला पिंजºयात कोंडून घेऊन बिबट्याला जंगलात पिटाळले.
या विचित्र घटनेची माहिती अशी की, देवळीमुरा गावातील एका घरात शिरलेल्या बिबट्याला ग्रामस्थांनी दाराला कडी लावून आत कोंडले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी पाचारण केले. यानंतर पहाटे तीन वाजता बिबट्याला जंगलात सोडण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, महाबळेश्वर तालुक्यातील देवळीमुरा गावात रामचंद्र धोंडिबा आखाडे हे कुटुंबीयांसह राहतात. रविवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास त्यांना कुत्र्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आला. पाहणी केल्यानंतर त्यांना आपल्याच घरातील एका खोलीत चक्क बिबट्या आढळून आला.
याबाबतची माहिती मिळताच ग्रामस्थांनी सुरक्षेच्या दृष्टीने प्रसंगावधान राखत घराला बाहेरून कडी लावली व तातडीने याची माहिती वनविभागाला दिली.वनविभागाचे कर्मचारी पिंजरा घेऊन घटनास्थळी दाखल झाले. वरिष्ठ अधिकाºयांचे आदेश आल्यानंतर पहाटे तीन वाजता वनकर्मचाºयांनी पिंजºयात बसून घराला लावलेली कडी काढली. यानंतर बिबट्या जंगलाच्या दिशेने निघून गेला. दरम्यान, या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाला आहे.
सुरक्षेसाठी रात्रगस्त
ग्रामस्थांच्या सुरक्षेच्या दृष्टीने वनविभागाकडून देवळीमुरा येथे रात्रगस्त घालण्यात येणार आहे. मात्र, ग्रामस्थ व शेतकºयांनीही सतर्क राहावे, रात्रीच्या वेळी घराबाहेर पडू नये असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, घरात शिरलेला बिबट्या खाद्याच्या शोधार्थ आला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.