बँक अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून कर्मचाऱ्यांची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2019 02:59 PM2019-05-06T14:59:50+5:302019-05-06T15:01:32+5:30
कोरेगाव येथील आयसीआयसीआय बँकेचे शाखाधिकारी महेश पाटील यांच्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून त्याच बँकेतील कर्मचऱ्यांयाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना रविवारी उघडकीस आली. याप्रकरणी शाखाधिकारी महेश पाटील याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा पुसेगाव पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.
पुसेगाव: कोरेगाव येथील आयसीआयसीआय बँकेचे शाखाधिकारी महेश पाटील यांच्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून त्याच बँकेतील कर्मचऱ्यांयाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना रविवारी उघडकीस आली. याप्रकरणी शाखाधिकारी महेश पाटील याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा पुसेगाव पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.
पंकज शिवाजी गायकवाड (वय २७, रा. शिंदेवाडी, ता. खटाव) असे आत्महत्या केलेल्या बँक कर्मचाऱ्यांचे नाव आहे. पोलिसांच्या आणि मयत युवकाचे वडील शिवाजी श्रीरंग गायकवाड (रा. शिंदेवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पंकज हा वडूज येथील आयसीआयसीआय या बँकेत दोन वर्षे कॉन्ट्रक्ट बेसेसवर काम करत होता. त्यानंतर त्याने या बँकेची परीक्षा देऊन त्याच बँकेत रिलेशनशीप आॅफिसर म्हणून पद मिळविले.
एक वर्षे पुणे येथील बँकेच्या शाखेत काम केल्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून पंकज कोरेगाव येथील आयसीआयसीआय बँकेच्या शाखेत काम करू लागला. शिंदेवाडीतून तो कामावर ये जा करत होता. दरम्यान, वर्षेभरापासून बँकेचे शाखाधिकारी महेश पाटील हे पंकजच्या मोबाईलवर सातत्याने कामावरून काढून टाकेन, अशी विनाकारण धमकी देत होते.
तुझे काम बरोबर नाही, तुला कामावरून काढून टाकणार आहे, तू त्याच लायकीचा आहे, तुझा प्रवासभत्ता बील मंजूर करणार नाही, काय करायचे ते कर, अशी वारंवार धमकी देत होते. याबाबत पंकज याच्या मोबाईलवर या दोघांतील संभाषण रेकॉर्डिंग झालेले आहे. त्याने दिवसभर इतरत्र फिरून आणलेली कामे संबंधित शाखाधिकारी दुसऱ्या व्यक्तीच्या नावे सातत्याने टाकत होते.
तुझ्यामुळे बँकेचा परफार्मन्स खाली आला आहे. कामावरून तरी काढून टाकतो नाही तर तुझी बदलीच करतो, अशी धमकी त्याच्या वॉट्सअॅपर त्यांच्याकडून दिली जात होती. घरची जबाबदारी अंगावर असल्याने जर कामावरून काढून टाकले तर काय होईल, त्यामुळे प्रचंड दबावाखाली व मानसिक धडपणाखाली पंकज गेल्या चारपाच दिवसांपासून होता.
या त्रासाला कंटाळून त्याने रविवारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. वडील शिवाजी गायकवाड यांनी फिर्याद दिल्यानंतर शाखाधिकारी महेश पाटीलवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला.