नोकरदारांचा रविवार रांगेत!
By admin | Published: November 13, 2016 11:25 PM2016-11-13T23:25:58+5:302016-11-13T23:25:58+5:30
तुफान गर्दीचा चौथा दिवस : बँका, एटीएमसमोर लांबच लांब रांगा
सातारा : नोकरदारांसाठी रविवार मजेचा दिवस. उशिरापर्यंत झोपायचं. चहा, नास्टा झाल्यावर थोडं फिरून यायचं. दुपारचं जेवण झालं की पुन्हा टीव्ही पाहत पडून राहायचं. पण हा रविवार त्यांच्यासाठी वाईट गेला. बहुतांश नोकरदारांना जुन्या नोटा बदलण्यासाठी बँकांमध्ये किंवा पैसे काढण्यासाठी एटीएमसमोर लागलेल्या रांगेत थांबून घालवावा लागला.
पाचशे अन् हजारांच्या नोटा व्यवहारातून मंगळवारी रात्रीपासून तडकाफडकी रद्द करण्यात आल्या. त्यानंतर बुधवारी बँका अन् एटीएम बंद होते. त्यामुळे दोन दिवस कोणालाच काही करता आले नाही. जुन्या नोटा बदलण्यास गुरुवारपासून सुरुवात झाली. संभाव्य गर्दीचा विचार करून नियमित वेळेच्या एक तास अगोदरच बँका उघडल्या; पण सर्वसामान्य ग्राहकांनी नऊपासूनच लांबच लांब गर्दी केली होती. एटीएम शुक्रवारपासून सुरू झाले; पण रविवारीही सत्तर टक्के एटीएम बंद आहेत. त्यामुळे आर्थिक नाकेबंदी सगळीकडून होऊ लागली आहे. बँकांसमोर सकाळसकाळ लागलेल्या रांगा पाहून नोकरदारांना कामावर जावे लागत होते. त्यांना जुन्या नोटा बदलण्यासाठी संधीच मिळाली नाही. त्यामुळे त्यांना रविवारी आळस झटकून सकाळीच बँकांमध्ये यावे लागले. अनेकांचा निम्मा दिवस जुन्या नोटा भरण्यासाठी बँकांमधील रांगेत तर उरलेला वेळ एटीएमसमोरच्या रांगेत घालवावा लागला. (प्रतिनिधी)
पुन्हा आठ दिवस कोणाला वेळ...
दिवाळीत पुरेशी खरेदी झालेली असल्याने अनेकांना गेल्या आठवड्यात फारशी गैरसोय झाली नाही. मात्र, आता शाळा-महाविद्यालये सुरू होत आहेत. त्यामुळे शाळांचा खर्च वाढणार आहे. साहजिकच खर्च आणखी वाढणार आहे. तसेच नोकरीच्या ठिकाणी जाण्यासाठी पेट्रोलशिवाय पर्याय नाही. पण, पेट्रोलपंपावरही अडवणूक केली जाते. पुन्हा आठवडाभर सुट्या नसल्यामुळे आठ दिवस लागणाऱ्या पैशांची सोय करावी लागणार आहे. त्यामुळे गर्दी पाहायला मिळत होती.