तुळशी अन् चंदनाच्या पानाने दिला रोजगार
By admin | Published: July 4, 2017 02:47 PM2017-07-04T14:47:15+5:302017-07-04T14:47:15+5:30
मंदिराबाहेरील चित्र : हंगामी व्यावसायिकांनी केली भक्तांची सोय
आॅनलाईन लोकमत
सातारा , दि. 0४ : हंगामी व्यावसायिकांना यंदाही विठ्ठलाचा आधार मिळाला आहे. विठ्ठलाच्या दर्शनाला जाताना आवश्यक असणारे तुळशी अन् चंदनाची पाने विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी यंदाही दिवसाला हजारो रूपये कमवुन आषाढी साजरी केल्याचे चित्र शहरातील मंदिराबाहेर पहायला मिळाले.
देशात सर्वाधिक मोठी कर्जमाफी महाराष्ट्र सरकारने केली आहे, बा विठ्ठला, आता शेतकरी कर्जमुक्त होऊ दे ! असे साकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपुरला विठ्ठलाकडे घातले. ज्या भक्तांना पंढरीला जाता आले नाही त्यांनी शहर व परिसरात असणाऱ्या मंदिरांमध्ये जावुन विठ्ठु रखमाईचे दर्शन घेतले. विठ्ठल दर्शनाला आवश्यक असणारे तुळशी अन् चंदनाचे पान विक्रीने यंदाही उच्चांक केली आहे. शहरातील मंदिराबाहेर सातशेहुन अधिक भक्तांनी पाच रूपयात याची खरेदी करून ते विठ्ठल चरणी अर्पण केल्याचे विक्रेत्याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
तुळशी पानांची तजवीज
विठ्ठलाच्या दर्शनासाठी आवश्यक असणाऱ्या तुळशीच्या पानांची तजवीज हंगामी व्यवसायिकांनी केली होती. शहर परिसरातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर तुळशीची रोपे असतात. पावसाळ्यात तुळशी चांगली फुटते म्हणून त्याची छाटणी केली जाते. अनेक व्यावसायिक आषाढीच्या आदल्या दिवशी ही छाटणी करतात. छाटणी केल्याच्या मोबदल्यात त्यांना तुळशीची पाने मिळतात, ही पाने दुसऱ्या दिवशी पाच रूपयांच्या दराने विकली जातात.
शहरात तुळशी विकतचीच!
निसर्गाच्या सानिध्यात सातारा वसले असले तरी वाढत्या अपार्टमेंटच्या जंगलामुळे आता दारातील तुळशी वृंदावनाची जागा गॅलरीतील तुळशीच्य रोपांनी घेतली आहे. पुरेशा सुर्यप्रकाशाअभावी ही रोपं खुरटीच राहतात. त्यामुळे गॅलरीत तुळस असुनही शहरात विठुरायाच्या भेटीसाठी जाताना तुळशी विकतचीच घ्यावी लागते.
चंदनाच्या पानांची कमतरता
शहर व परिसरात चंदनाच्या झाडांची लागवड अल्प आहे. जिथे कुठे चंदनाचे झाड वाढलेले दिसते, त्यावर रात्री चोरटे कुऱ्हाडी मारतात. त्यामुळे यंदाही चंदनाच्या पानांची कमतरता जाणवली. त्यामुळे यंदाही तुळशीच्या पाच पानांबरोबर एक चंदनाचे पान विक्रीस होते.
सत्तर रूपयांच्या भांडवलात सहाशेचा नफा!
सातारा शहरात प्रथमच मंदिराबाहेर चंदनाचा टिळा लावणाऱ्या व्यावसायिकांनी हजेरी लावली होती. पायी दिंडीत ठिकठिकाणी हातात गंधाचा डबा आणि नामाचा आकार असलेला साचा घेवुन फिरणारे व्यावसायिक यंदा शहरातील मंदिरांच्या बाहेरही दिसली. मंदिरात येणाऱ्या जाणाऱ्यांना आडवून विठ्ठल सेवेच्या नावाखाली हा गंध लावण्याचा कार्यक्रम सुरू होता. एखाद्या भक्ताने किती द्यायचे विचारले की ‘स्वेच्छेने पाच रूपये द्या’ हे वाक्य ठरलेलं. या व्यावसायिकांनीही सत्तर रूपयांच्या भांडवलात सहाशे रूपये कमावले हे विशेष!
यंदा तुळशी अन् चंदनाच्या पानांना ग्राहकांची चांगलीच मागणी होती. सकाळी ६ वाजल्यापासुन सहाशे जुड्या विकल्या. संध्याकाळपर्यंत हजार जुड्या विकल्या जातील.
- सुनिता साळुंखे,
हंगामी व्यावसायिक