फलटणच्या उपनगराध्यक्षाला सक्तमजुरी
By admin | Published: September 30, 2016 11:16 PM2016-09-30T23:16:01+5:302016-10-01T00:22:03+5:30
महिला अधिकाऱ्याचे विनयभंग प्रकरण
सातारा : फलटण पालिकेतील महिला प्रकल्प अधिकाऱ्याचा विनयभंग केल्याप्रकरणी विद्यमान उपनगराध्यक्ष पांडुरंग मानसिंग गुंजवटे (वय ५७, रा. फलटण) यांना तिसरे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. के. चव्हाण यांनी तीन वर्षे सक्तमजुरी तसेच पाच हजार रुपये दंड, दंड न दिल्यास तीन महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.
या खटल्याची पार्श्वभूमी अशी, संबंधित प्रकल्प अधिकारी महिला फलटण पालिकेत ३ मार्च २०१४ रोजी नेहमीप्रमाणे काम करत होती. त्यावेळी तेथे गुंजवटे गेले. ‘माझं काम का केलं नाही,’ अशी विचारणा करत त्यांना शिवीगाळ व दमदाटी करून त्यांच्याशी गैरवर्तन केले. याप्रकरणी संबंधित महिला अधिकाऱ्याने फलटण शहर पोलिस ठाण्यात गुंजवटे यांच्याविरोधात तक्रार दिली होती. त्यावेळी गुंजवटे नगरसेवक होते. उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल माकणीकर यांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
न्यायालयापुढे आलेले पुरावे आणि साक्षीदार ग्राह्य मानून न्यायालयाने गुंजवटे यांना तीन वर्षे सक्तमजुरी आणि कोर्ट उठेपर्यंतची शिक्षा सुनावली. सहायक सरकारी वकील ज्योती दिवाकर यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिले. पोलिस प्रॉसिक्युशनचे हवालदार अवधूत ननावरे यांनी त्यांना सहकार्य केले. (प्रतिनिधी)