पालिका शिक्षण मंडळाच्या लिपिकाला सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 06:07 PM2020-02-29T18:07:38+5:302020-02-29T18:08:56+5:30
पालिकेच्या शाळेत काम करणाऱ्या शिक्षकांच्या वरिष्ठ वेतन श्रेणीचा फरक देण्यासाठी १४ हजारांची लाच घेणारा पालिकेच्या शिक्षण मंडळाचा मुख्य लिपिक आनंदराव गोविंदराव नवाळे याला चार वर्षे सक्तमजुरीचा शिक्षा व पाच हजार रुपये दंड तसेच दंड न दिल्यास तीन महिने सक्तमजूरी अशी शिक्षा न्यायालयाने सुनावली. या शिक्षेमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
सातारा : पालिकेच्या शाळेत काम करणाऱ्या शिक्षकांच्या वरिष्ठ वेतन श्रेणीचा फरक देण्यासाठी १४ हजारांची लाच घेणारा पालिकेच्या शिक्षण मंडळाचा मुख्य लिपिक आनंदराव गोविंदराव नवाळे याला चार वर्षे सक्तमजुरीचा शिक्षा व पाच हजार रुपये दंड तसेच दंड न दिल्यास तीन महिने सक्तमजूरी अशी शिक्षा न्यायालयाने सुनावली. या शिक्षेमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
या खटल्याची थोडक्यात पार्श्वभूमी अशी, नवाळे हा सातारा पालिकेच्या शिक्षण मंडळात मुख्य लिपिक म्हणून नोकरी करत होता. पालिकेच्या शाळेत नोकरी करणाऱ्या शिक्षकांच्या पगारातील वरिष्ठ वेतन श्रेणीचा फरक काढून देण्यासाठी नवाळे यांना एकूण सात शिक्षकांना प्रत्येकी दोन हजार असे १४ हजार रुपये लाच म्हणून मागितले होते.
त्यानंतर त्या सातपैकी एका शिक्षकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे २६ आॅगस्ट २०१४ रोजी तक्रार दिली होती.
तक्रार अर्ज आल्यानंतर एसीबीचे तत्कालीन पोलीस निरीक्षक बयाकी कुरळे यांनी लाच मागणीची पडताळणी करून नवाळे याला पडकडण्यासाठी २६ आॅगस्ट २०१४ रोजी शिक्षण मंडळाच्या कार्यालयाच्या परिसरात सापळा लावला होता. त्यावेळी नवाळे हा १४ हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात रंगेहात सापडला होता.
तत्कालीन पोलीस निरीक्षक बयाजी कुरळे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्याची सुनावणी न्यायाधीश एन.एल.मोरे यांच्यसमोर झाली. सरकारी वकिलांनी केलेला युक्तीवाद व साक्षी ग्राह्य धरून न्यायाधीशांनी नवाळे याला चार वर्षे सक्तमजुरीचा शिक्षा व पाच हजार रुपये दंड तसेच दंड न दिल्यास तीन महिने सक्तमजूरी शिक्षा सुनवाली.