सहा दिवसांत सक्तमजुरीची शिक्षा
By admin | Published: March 27, 2017 11:43 PM2017-03-27T23:43:47+5:302017-03-27T23:43:47+5:30
रेल्वे पोलिसांची तत्परता : चोरीप्रकरणी कोरेगाव न्यायालयाचे जलदगतीने कामकाज
कोरेगाव : रेल्वे पोलिसांच्या रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार शाहरुख हसन बागवान याला चोरीच्या गुन्ह्यात मिरज पोलिसांनी सोमवारी अटक केली होती. त्याने चोरीची बॅग कोरेगाव रेल्वे स्थानकाच्या हद्दीत टाकल्यामुळे त्याच्या विरोधात कोरेगाव न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. न्यायालयाने जलदगतीने कामकाज करत अवघ्या सहा दिवसांमध्ये त्याला सहा महिने सक्तमजुरी आणि तीनशे रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
या खटल्याची माहिती अशी की, शाहरुख बागवान (रा. भवानी पेठ, पुणे) याच्या विरोधात रेल्वेमध्ये चोरीचे आठ गुन्हे नोंद आहेत. सोमवार, दि. २० रोजी अजमेरहून बंगलोरकडे निघालेल्या एक्स्प्रेसमध्ये त्याने एका प्रवाशाची बॅग चोरली. बॅग चोरीस गेल्याचे लक्षात आल्यावर संबंधित प्रवासी व त्याच्या नातेवाइकांनी शोधाशोध सुरू केली. दरम्यानच्या काळात शाहरुखने एक्स्प्रेसमधील स्वच्छतागृहात जाऊन चोरीची बॅग खाली फेकून दिली. ही घटना कोरेगाव रेल्वे स्थानकाच्या हद्दीत घडली.
या प्रवाशाने मिरज रेल्वे पोलिस ठाण्यात बॅग चोरीची फिर्याद दाखल केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रकांत भोसले यांनी तत्काळ पोलिस अधीक्षक (लोहमार्ग, पुणे) डॉ. प्रभाकर बुधवंत यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यांच्या सूचनेनुसार रेल्वे पोलिसांनी त्याचदिवशी रात्री सांगली येथून शाहरुख बागवानला अटक केली. त्याने कोरेगावात येऊन बॅग शोधून पोलिसांच्या हवाली केली.
सहायक फौजदार एम. जे. दरेकर यांच्यासह पोलिस हवालदार अजित सावंत, भार्गव साखरे, नाईक एम. ए. साठे, महिला पोलिस नाईक एस. के. सरोदे, शिपाई आर. एस. भोसले, एम. एस. निर्मळ यांनी तातडीने तपास पूर्ण केला आणि गुन्हा घडल्यापासून अवघ्या चोवीस तासांत कोरेगाव न्यायालयात बागवान याच्या विरोधात दोषारोपपत्र सादर केले. यावेळी बागवान याला न्यायालयात हजर करण्यात आले होते.
प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी महेश शिलार यांनी याप्रकरणी सोमवार, दि. २७ रोजी सुनावणी होऊन सर्व साक्षीदारांचे जाबजवाब झाले. पोलिस अभियोक्ता नितीन कानिटकर यांनी बाजू मांडली. त्यानंतर न्यायालयाने शाहरुख बागवान याला दोषी ठरवत सहा महिने सक्तामजुरी आणि तीनशे रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली.