खळे येथील बंधारा दुरुस्ती करूनही रिकामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:39 AM2021-04-21T04:39:49+5:302021-04-21T04:39:49+5:30
ढेबेवाडी : वांग नदीवर खळे (ता. पाटण) नजीक बारा वर्षांपासून रखडलेला कोल्हापूर पद्धतीचा बंधारा यावर्षी पूर्ण झाला. यामुळे लाभक्षेत्रातील ...
ढेबेवाडी
: वांग नदीवर खळे (ता. पाटण) नजीक बारा वर्षांपासून रखडलेला कोल्हापूर पद्धतीचा बंधारा यावर्षी पूर्ण झाला. यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची लकेर उमटली; मात्र बंधाऱ्याच्या कामात त्रुटी राहिल्याने पाणी अडवूनही बंधारा कोरडाच पडत आहे. धरणातून पाणी सोडूनही येथील शेतकऱ्यांच्या आशेवर बंधाऱ्यातील गळतीचे पाणी फिरल्याने कडाक्याच्या उन्हाळ्यात पिकेही कोमेजत आहेत.
स्थानिक शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, खळे येथे कोल्हापूर पद्धतीचा बंधारा व्हावा, अशी या परिसरातील शेतकऱ्यांची फार पूर्वीपासून मागणी होती; मात्र शासनाने फारसे गांभीर्याने घेतले नाही. पुढे वांग मराठवाडी धरणाच्या लाभ क्षेत्रात दहा कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे नियोजन झाले. प्रकल्पाचे काम वेगाने होत असले तरी काम रेंगाळलेलेच राहील.
बारा वर्षांपूर्वी भूमिपूजन होऊन बांधकामाचा शुभारंभ झाला. काही प्रमाणात काम झाले; मात्र पुढे निधीची उपलब्धता ही समस्या निर्माण होत बंधाऱ्याने काम रखडले. राजकीय स्थित्यंतरात हे काम रखडतच राहिले. अखेर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नातून बंधाऱ्यांसाठी निधीची उपलब्धता होऊन गेल्या दोन वर्षांपूर्वी काम सुरू झाले. बंधारा पूर्ण झाला.
बंधाऱ्याचे काम पूर्ण होऊन तो पाणीसाठा
करण्यासाठी योग्य झाला. यंदा प्रथमच रब्बी हंगामाचे पहिले आवर्तन सोडून बंधाऱ्यात पाणीसाठा केला; पण गळतीमुळे बंधाऱ्यात पाणी राहिले नाही. बंधारा कांही दिवसात रिकामा झाला. त्यानंतर गळती काढण्याचा प्रयत्न झाला; पण गळती निघालीच नाही. २५ मार्च रोजी दुसऱ्या आवर्तनासाठी सोडलेल्या पाण्यामुळे बंधाऱ्यातून सगळीकडून पाण्याची गळती सुरू आहे. काही प्लेटस् वाहून गेल्या. त्यानंतर प्रसारमाध्यमांनी या निकृष्ट कामाचा पंचनामा केला. त्यानंतरही बंधारा दुरुस्तीचा केविलवाणी प्रयत्न झाला.
आता बंधाऱ्यात पाणी साठा होईल म्हणून शेतकऱ्यांनी बंधाऱ्याकडे नजरा लावल्या; पण गळती थांबली नसल्याने पाणी साठा झाला नाही. निकृष्ट कामामुळेच ही गळती होत आहे, असा आरोप करून याची चौकशी करा व गळती काढा, अशी मागणी होत आहे.
फोटो रविंद्र माने यांनी मेल केला आहे.
खळे येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधाऱ्यास सगळीकडेच गळती असल्यामुळे पाणी वाहून जात आहे. (छाया : रवींद्र माने)