कऱ्हाडच्या मंडईतील अतिक्रमण हटवले, पालिकेची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2020 07:38 PM2020-11-11T19:38:45+5:302020-11-11T19:40:25+5:30
Muncipal Corporation, Satara area, karad कऱ्हाड येथील पालिकेच्यावतीने मंडई परिसरात मंगळवारी अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. रस्त्यावर थाटण्यात आलेले गाडे, पानटपऱ्या, दुकानांचे साहित्य यावेळी जप्त करण्यात आले. तसेच रस्त्यावर भाजी विक्री करणाऱ्यांनाही समज देण्यात आली.
कऱ्हाड : येथील पालिकेच्यावतीने मंडई परिसरात मंगळवारी अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. रस्त्यावर थाटण्यात आलेले गाडे, पानटपऱ्या, दुकानांचे साहित्य यावेळी जप्त करण्यात आले. तसेच रस्त्यावर भाजी विक्री करणाऱ्यांनाही समज देण्यात आली.
दरम्यान, दीपावलीच्या पार्श्वभूमीवर अनेक लहान-मोठे विक्रेते रस्त्यानजीक व्यवसाय करीत असून, त्यांना या कालावधित व्यवसाय करू द्यावा. त्यांचे व्यवसाय हटवू नयेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. विविध संघटनांही आक्रमक झाल्या. अखेर मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या कक्षात याबाबत सकारात्मक चर्चा होऊन दीपावलीनंतर ही मोहीम पुन्हा सुरू करण्याचे ठरविण्यात आले.
शहरातील प्रभात टॉकीज, महात्मा फुले पुतळ्यापासून जनता व्यासपीठापर्यंत पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण मोहीम राबवण्यात आली. त्यामध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहतुकीला अडथळा ठरणारी खोकी, हातगाडे व अन्य साहित्य हटविण्यात आले. तर जनता व्यासपीठासमोर पार्क केलेली अनेक वाहने काढण्यात आली. मुख्याधिकारी रमाकांत डाके व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही मोहिम सुरू केली. महात्मा फुले पुतळ्यापासून मंडईकडे जाणाऱ्या रस्त्यालगतचे काही गाडे पालिकेने ताब्यात घेतले. तर या परिसरात रस्त्यावर बसणाऱ्या विक्रेत्यांना बसण्यास मनाई करण्यात आली. पालिकेच्या कम्पाऊंडसमोरील भाजी विक्रेत्यांनाही हटविण्यात आले.
जनता व्यासपीठासमोरील मैदानात अनेक दिवसांपासून पार्क केलेली वाहने हटवण्यात आली. मैदानात असणारी खोकी, चायनीजचे गाडे काढण्यात येऊन इतरत्र बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांना बसण्यासाठी जागा मोकळी करून देण्यात आली. यावेळी पालिका अधिकारी, कर्मचारी यांच्याबरोबर विक्रेत्यांनी बराच वेळ वाद घातल्याने मोठी गर्दी झाली होती. सध्या दिवाळीमुळे अनेक छोट्या विक्रेत्यांनी विविध साहित्य विक्रीसाठी ठेवले आहे. त्यामुळे त्यांना पालिकेने हटवू नये, अशी मागणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी डाके यांच्यासमोर केली.
रस्त्यावर भाजी विकल्यास कारवाई
विविध संघटनेचे पदाधिकारी व विक्रेत्यांसोबत बराच वेळ चर्चा होऊनही तोडगा न निघाल्याने मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या कक्षात याबाबत बैठक झाली. या बैठकीत रस्त्यावर बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांना मुख्य मंडईत जागा उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा झाली. सबंधित विक्रेते पुन्हा रस्त्यावर बसल्यास पालिका कारवाई करणार असल्याचे सांगण्यात आले.