फुटपाथवर अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:12 AM2021-03-04T05:12:18+5:302021-03-04T05:12:18+5:30

सातारा : अनधिकृत अतिक्रमणांवर सातत्याने कारवाई करूनही विक्रेते व व्यावसायिकांकडून रस्त्यांवर पुन्हा अतिक्रमण केले जात आहे. शहरातील राजवाडा, राजपथ, ...

Encroachment on sidewalk | फुटपाथवर अतिक्रमण

फुटपाथवर अतिक्रमण

googlenewsNext

सातारा : अनधिकृत अतिक्रमणांवर सातत्याने कारवाई करूनही विक्रेते व व्यावसायिकांकडून रस्त्यांवर पुन्हा अतिक्रमण केले जात आहे. शहरातील राजवाडा, राजपथ, गोलबाल, मोती चौक, खणआळी या परिसरात अनेक विक्रेते व दुकानदारांकडून रस्त्यावरच अतिक्रमण केले आहे. काही विक्रेत्यांकडून राजपथावरील फुटपाथवर खाद्यपदार्थांच्या गाड्या तसेच हॉटेलचे फलक लावल्याने याचा पादचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

पाण्याचा अपव्यय

सातारा : सदर बजार, जिल्हा रुग्णालय, जिल्हा परिषद व गोडोली आदी भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिनीला ठिकठिकाणी गळती लागली आहे. त्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. जीवन प्राधिकरणाकडून गळती काढण्याचे काम तातडीने केले जाते; परंतु बऱ्याचदा अवजड वाहनांमुुळे जलवाहिनी फुटण्याच्या घटनाही सातत्याने घडत आहेत. जीवन प्राधिकरणाने गळतीचे काम तातडीने मार्गी लावावे, अशी मागणी होत आहे.

प्लास्टिकचा बोलबाला

सातारा : प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी घालण्यात आली असूनही शहरात प्लास्टिक पिशव्यांचा चोरी-छुपे वापर केला जात आहे. पालिकेच्या दंडात्मक कारवाईची नागरिकांनी धास्ती घेतली होती. मात्र, गेल्या दीड वर्षापासून ही मोहीम बंद असल्याने व्यापारी, दुकानदार व फळविक्रेते अजूनही प्लास्टिक पिशव्यांचा चोरी-छुपे वापर करू लागले आहेत. पालिकेने शहरात पुन्हा एकदा कारवाई मोहीम राबविणे गरजेचे बनले आहे.

डुकरांचा सुळसुळाट

सातारा : शहरातील सदर बझार परिसरात डुकरांचा सुळसुळाट वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. मोकाट डुकरांच्या उपद्रवाबाबत पालिकेत तक्रारी दाखल झाल्या होत्या. याची दखल घेत पालिकेने वराह पालन करणाऱ्या नागरिकांच्या मदतीने मोकाट डुकरे पकडली होती. मात्र, ही मोहीम थंडावल्याने सदर बझार, माची पेठ, केसरकर पेठ परिसरात डुकरांच्या संख्येत पुन्हा वाढ झाली आहे. पालिकेने पुन्हा एकदा ही मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

दुरुस्तीची मागणी

महाबळेश्वर : महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावर असलेल्या आंबेनळी घाटातील रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. घाटातील संरक्षक कठडे ढासळले असून, कोठेही दिशादर्शक फलक नाहीत. त्यामुळे रात्रीच्या वेळी वाहनधारकांना अनेक अडचणी निर्माण होत आहेत. पावसामुळे घाटात दरड कोसळण्याच्या घटनाही सुरू झाल्या आहेत. हा धोका लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम विभागाने घाटातील संरक्षक कठड्यांची तातडीने डागडुजी करून वाहनधारकांची परवड थांबवावी, अशी मागणी होत आहे.

केळघर परिसरात डोंगरावर वणवा

वाई : वाई तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून डोंगरावर वणवा लावण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. या वणव्यामुळे निसर्गसंपदेसह सूक्ष्मजीवांची हानी होत असून वनवे लावल्यामुळे हिरवेगार डोंगर काळे पडू लागले आहेत. तसेच औषधी वनस्पती, झाडे तसेच सूक्ष्म जीवांचा बळी जात आहे. वन विभागाने याबाबत ठोस पावले उचलावीत, अशी मागणी पर्यावरणप्रेमींमधून होत आहे

वाहतुकीची कोंडी

सातारा : शहरातील तहसील कार्यालयासमोर वाहतुकीची सतत कोंडी होत आहे. अनेक खासगी वाहने, रिक्षा, मालवाहतूक करणारी वाहने याच मार्गावरून ये-जा करतात. तर अनेक वाहनधारक रस्त्याकडेला तसेच दुकानांच्या समोर नो पार्किंगमध्ये वाहने लावत आहेत. पोलिसांच्या वतीने येथील वाहतुकीबाबत उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

वाहनधारकांत समाधान

सातारा : जुना मोटर स्टॅँड ते बुधवार नाका या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम पालिकेकडून नुकतेच पूर्ण करण्यात आले आहे. खड्डेमय रस्त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेली परवड थांबल्याने वाहनधारकांसह व्यापाऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. खड्डेमय रस्त्यांमुळे वाहनधारकांसह नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.

Web Title: Encroachment on sidewalk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.