वाठार स्टेशन येथे पुणे-कोल्हापूर पॅसेंजरचे इंजिन घसरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 11:17 PM2018-12-02T23:17:23+5:302018-12-02T23:17:28+5:30
आदर्की : पुणे-मिरज लोहमार्गावर रविवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास कोरेगाव तालुक्यातील वाठार स्टेशन हद्दीत कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या पॅसेंजर रेल्वेचे ...
आदर्की : पुणे-मिरज लोहमार्गावर रविवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास कोरेगाव तालुक्यातील वाठार स्टेशन हद्दीत कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या पॅसेंजर रेल्वेचे इंजिन घसरले. चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे कोणत्याही स्वरूपाची जीवितहानी झाली. मात्र, सुमारे ५ तास लोहमार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
याबाबत माहिती अशी की, पुणे-मिरज लोहमार्गावर ५१४०९ पुणे-कोल्हापूर पॅसेंजर सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास कोल्हापूरच्या दिशेने जात होती. रेल्वे बारा वाजण्याच्या सुमारास आदर्कीहून रवाना झाली. वाठार स्टेशनपासून दोन किलोमीटर अंतरावर रेल्वे चालकाला रुळावर काहीतरी वस्तू असल्यासारखी दिसली. ती लोखंडी असावी असा संशय आल्याने चालकाने अचानक ब्रेक लावला. तरीही नियंत्रण सुटून रेल्वे इंजिनची (डब्ल्यू डीपी ४ डी) पुढील चाके रुळावरून घसरली. इंजिन रुळ सोडून तशीच पुढे जात राहिल्याने लोहमार्गावर शंभर ते दोनशे मीटर अंतरातील सिमेंट शिल्पर, लोखंडी लाईनर, जाँईट पट्टी, बोल्ट तुटले. तसेच रेल्वे इंजिनची संरक्षक जाळी तुटली. मात्र, कोणतीही जीवितहानी झाली नाही. या पॅसेंजरमध्ये सुमारे दीड हजार प्रवासी होते.
अपघाताची माहिती समजताच वाठार पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील, सहायक फौजदार व्ही. के. धुमाळ, राहुल कांबळे व कर्मचारी तातडीने हजर झाले. सातारा, वाठार, नीरा येथून रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी, रेल्वे अधिकारी व कर्मचाºयांच्या पाच तासांच्या प्रयत्नानंतर लोहमार्गावर वाहतूक सुरळीत करण्यात आली. रात्री ९ वाजून १० मिनिटांनी या मार्गावरून पहिली रेल्वे रवाना झाली. या अपघातामुळे रेल्वे प्रवाशांचा मात्र खोळंबा होऊन मोठे हाल झाले.
इतर रेल्वे गाड्यांना उशीर
या अपघातानंतर रेल्वे प्रशासनाने मुंबई-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस लोणंद रेल्वे स्थानकावर थांबवून तिचे इंजिन काढून अपघातस्थळी आणले. त्याच्या मदतीने पॅसेंजर आदर्की स्थानकावर आली. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत लोहमार्ग दुरुस्तीचे काम सुरू होते. दरम्यान, पुण्याच्या दिशेने जाणारी अजमेर एक्स्प्रेस सातारा स्थानकावर थांबवण्यात आली.