इंजिनिअर रमलाय रंगांच्या दुनियेत : वडगावच्या चित्रकाराची कथा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 10:36 PM2018-06-22T22:36:51+5:302018-06-22T22:38:06+5:30
उंब्रज :शेतकऱ्याच्या पोराला निसर्गाच्या विविध रंगांचा नाद लागला. चित्रकलेचे कोणतेही प्रशिक्षण न घेता त्याने हातात ब्रश घेतला. रंगाच्या कुंचल्यातून त्याने समाजातील विविध पैलू कागदावर रेखाटण्यास सुरुवात केली.
अजय जाधव ।
उंब्रज :शेतकऱ्याच्या पोराला निसर्गाच्या विविध रंगांचा नाद लागला. चित्रकलेचे कोणतेही प्रशिक्षण न घेता त्याने हातात ब्रश घेतला. रंगाच्या कुंचल्यातून त्याने समाजातील विविध पैलू कागदावर रेखाटण्यास सुरुवात केली. आपल्या कलेतून अभूतपूर्व चित्र रेखाटणारा हा ग्रामीण भागातील तरुण चित्रकार या कलेचे चीज होण्यासाठी धडपड करतोय.
कऱ्हाड तालुक्यातील वडगाव-उंब्रज येथील चोवीस वर्षांचा तरुण चित्रकार महेश संजय पवार. प्राथमिक शिक्षण त्याने गावातल्या शाळेत तर माध्यमिक शिक्षण इंदोली येथील शाळेत घेतले. अभ्यासात हुशार असल्यामुळे त्याने इंजिनिअरिंगसाठी साताऱ्यात प्रवेश घेतला. इंजिनिअरिंगमध्ये इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशनची पदवी त्याने मिळविली. पुणे येथे त्याला नोकरीही लागली. पगार सुरू झाला; परंतु शालेय जीवनात पेन्सिलने चित्र काढण्याचा लागलेला नाद मात्र त्याला गप्प बसू देत नव्हता. आणि शेवटी पगारी नोकरीला लाथ मारून आपला नाद, छंद जोपासण्यासाठी त्याने गावाकडे येण्याचा निर्णय घेतला. गावातल्या पडक्या घरात फुटलेल्या कौलातून पडणाºया कवडशात तो कुंचल्यातून रंग कॅनव्हासवर उमटवू लागला.
चित्रकार होण्यासाठी लागणारे कोणतेही शिक्षण महेशने घेतलेले नाही; पण स्वत:च्या बोटावर असलेल्या आत्मविश्वासावर तो चित्र काढत आहे. त्याने काढलेल्या विविध कलाकृती पाहिल्या तर नामांकित चित्रकाराच्या कुंचल्यातून त्या तयार झाल्या असाव्यात, असे वाटते.
शेतकºयाचा पोरगा ते चित्रकार व्हाया इंजिनिअर असा महेशचा प्रवास थक्क करणारा आहे. या प्रवासाबाबत त्याला माध्यमिक शाळेतील शिक्षक सागर मुळे, प्राध्यापिका गायत्री मिरजकर यांनी मार्गदर्शन व आर्थिक साह्य केले. महेशचे गावातले राहते घर मोडकळीस आले होते. फुटलेल्या कौलातून किरणांचा कवडसा घरात पडत असे. किरणे व किरणांचे रंग पाहता हा अवलिया कॅनव्हासवर चित्रात रंग भरू लागला. मोठ्या भावाने केलेल्या आर्थिक मदतीमुळे हे पवार कुटुंबीय नुकतेच पडक्या घरातून नवीन घरात राहण्यास आले आहे. आपलं इंजिनिअर झालेलं पोरगं नोकरी सोडून चित्रकलेचा नाद करून स्वत:सह कुटुंबाचा आर्थिक तोटा करत आहे, अशी मानसिकता सर्वसामान्य पालकांसारखी महेशच्या पालकांची असेल असे वाटत होते. पण या पालकांना आपल्या चित्रकार पोराचं मोठ कौतुक आहे, हे विशेष.
चित्रं परदेशात गाजण्याची अपेक्षा
पगारी नोकरीला लाथ मारून चित्रकलेलाच आयुष्य वाहून घेतलेला महेश हा युवा चित्रकार आज आपले चित्र देशपातळीवर नव्हे तर परदेशातही गाजणारच, याच्या प्रतीक्षेत ‘त्या’ वेळेची फक्त वाट पाहतोय. त्यासाठी त्याचे प्रयत्नही सुरू आहेत. त्याच्या ब्रशमधून दररोज वेगवेगळी चित्रे कॅनव्हासवर येतायत. भविष्यात हीच चित्रं त्याच्या यशाची गुरुकिल्ली ठरतील, हे निश्चित.
मला शेती सव्वा एकर. मला शिकायचं होतं; पण घरच्या परिस्थितीने शिकता आले नाही. पोरांना शिकवायचं मी ठरवलं. गावातली इतरांची जमीन वाट्याने घेतली. काबाडकष्ट केलं. पोरं शिकवली. इंजिनिअर झालेलं पोरगं नोकरी सोडून आलं. चित्रं काढू लागलं. त्याने काढलेली चित्र पाहिली तर बघत राहावसं वाटतं. तो कलाकार आहे. आज नाही उद्या, यश येईल. आमच्यासह गावाचे नाव सर्वत्र तो नक्की करेल.
- संजय पवार, वडील