अभियंतेही ठाकले तलाठीपदाच्या रांगेत!
By admin | Published: September 11, 2015 09:18 PM2015-09-11T21:18:16+5:302015-09-11T21:18:16+5:30
ऐकावं ते नवलच : जिल्ह्यात ‘अण्णासाहेबां’च्या ५२ जागांसाठी तब्बल २० हजार ६८५ उमेदवार देणार परीक्षा--लोकमत विशेष
सातारा : सरकारी नोकरीचा मोह उच्चशिक्षितांनाही चुकला नाही. दिवसेंदिवस बेकारीच्या झळा वाढू लागल्या असल्याने मेंदू आणि मनगटाला काम मिळेना झाले आहे. यातूनच इंजिनिअरची पदवी घेतलेली मुले-मुलीही मिळेल ती नोकरी पत्करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यातूनच सातारा जिल्हा महसूल विभागातील तलाठी पदाच्या ५२ जागांसाठी चक्क २० हजार ६८५ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. येत्या १३ सप्टेंबर रोजी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.तलाठी पदासाठी खरेतर पात्रता आहे कुठल्याही शाखेचा पदवीधर. त्याव्यतिरिक्त कुठलीही पात्रता त्यासाठी लागत नाही. मात्र, दिवसेंदिवस बेकारी वाढत असल्याने स्पर्धा वाढत असल्याचे पुढे येत आहे. तलाठी बनण्यासाठी स्पर्धा परीक्षेच्या धर्तीवर एक लेखी परीक्षा घेतली जाते. यामध्ये बुद्धिमत्ता चाचणी, गणित, सामान्यज्ञान, मराठी, इंग्रजी या विषयांवर प्रश्न विचारले जातात. इंजिनिअरिंग झालेली मुले गणितात अव्वल असतात. त्यामुळे त्यांच्यासाठी ही परीक्षा म्हणजे नोकरी मिळण्याचे हुकमी साधन ठरते. सातारा जिल्ह्यात अभियांत्रिकीची नावाजलेली महाविद्यालये आहेत; पण यातून बाहेर पडणाऱ्या इंजिनिअर्सना साताऱ्यात नोकरी नाही, अशी स्थिती आहे. काही महिन्यांपूर्वी एका चांगल्या कंपनीने साताऱ्यातून काढता पाय घेतला. त्यामुळे शेकडो तरुणांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली. जिल्ह्यातील रोजगार कमी होत चालला असताना मुले पर्यायी नोकऱ्यांचा शोध घेत आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारी खात्यातील शिपाई पदापासून ते अधिकारी पदापर्यंत जी परीक्षा मिळेल, त्याला सामोरे जाण्याचे प्रत्येकाचे धोरण पाहायला मिळते. बेरोजगारीच्या चटक्यांची जाणीव करून देणाऱ्या या घडामोडी सातारकर युवकांच्या सद्य:स्थितीवर प्रकाश टाकणाऱ्या ठरल्या आहेत. (प्रतिनिधी)
वीस टक्के मुले पदव्युत्तर गुणवत्ताधारक!
तलाठी परीक्षेसाठी २० टक्के मुले पदव्युत्तर पदवी घेतलेले आहेत. त्यापैकी ५ टक्के मुलांनी इंजिनिअरिंग केलेले आहे. अनेकांनी आयटीआय करून नोकरीचा शोध घेतला; मात्र पदवी हातात घेऊन सरकारी नोकरीचा शोध सुरू केला आहे. साताऱ्यात गुणवत्ता संपादन करणाऱ्यांना नोकरीच मिळत नसल्याचे चित्र या निमित्ताने स्पष्ट होत आहे.
मी इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे. नोकरीसाठी औद्योगिक कंपन्यांमध्ये अर्ज करून ठेवले आहेत. शिक्षणासाठी लाखो रुपये खर्च केले; आता मात्र ४ हजार रुपये पगार परवडत असेल तर नोकरी करा, अशी कंपन्यांची अट आहे. वय आहे तोपर्यंत सरकारी नोकरी शोधणार आहे.
- संदीप कुंभार, इंजिनिअर