उडी मारून अभियंत्याची आत्महत्या
By admin | Published: March 11, 2017 10:31 PM2017-03-11T22:31:42+5:302017-03-11T22:31:42+5:30
मध्यवर्ती बसस्थानकाजवळील घटना : इमारतीच्या सुमारे शंभर फुटांवरुन स्वत:ला दिले झोकून
सातारा : बसस्थानकाशेजारील एका इमारतीवरून उडी टाकून संतोष गोपाळ कांबळे (वय ३९, रा. सिद्धार्थनगर करमाळा, जि. सोलापूर) या अभियंत्याने शनिवारी सकाळी सात वाजता आत्महत्या केली. या घटनेमुळे बसस्थानक परिसरात खळबळ उडाली असून, बेरोजगाराला कंटाळून त्यांनी हे कृत केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
‘मला नोकरी लागली आहे,’ असे सांगून संतोष कांबळे हे गेल्या चार दिवसांपूर्वी घरातून निघून आले होते. शनिवारी सकाळी सहाच्या सुमारास ते बसस्थानक परिसरातून फिरत असल्याचे काही नागरिकांनी पाहिले असल्याचे समोर आले आहे. बसस्थानकातून ते चालत पोवई नाका येथे गेले. त्यानंतर पुन्हा परत ते बसस्थानकाकडे आले. बसस्थानकाशेजारी इमारतीसमोर एका दुकानाचे उद्घाटन होते. या ठिकाणी ते काहीवेळ थांबले. त्यानंतर जिन्यावरून इमारतीवर गेले. टेरेसच्या कडठ्यावर उभे राहून त्यांनी तेथून उडी मारली. ज्या ठिकाणी दुकानाच्या उद्घाटनाची लगबग सुरू होती. नेमकी त्याच ठिकाणी त्यांनी उडी मारली. मोठा आवाज आल्याने रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांनी धाव घेतली. संतोष कांबळे यांच्या कानातून आणि डोक्यातून रक्तस्त्राव सुरू झाला. काही नागरिकांनी रुग्णवाहिका आणि पोलिसांना याची माहिती दिली. तोपर्यंत नागरिकांनी संतोष कांबळे यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती चिंताजनक बनल्याने त्यांना पुणे येथे हलविण्यात आले. दुपारी बारा वाजता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
पोलिसांनी त्यांचे खिसे तपासले असता त्यांच्या खिशामध्ये चिठ्ठी सापडली. त्यामध्ये त्यांनी ‘मी वेडा आहे. म्हणून मी आत्महत्या करत आहे,’ असा उल्लेख आहे. मात्र, त्यांच्या नातेवाइकांनी पोलिसांना वेगळीच माहिती दिली आहे. संतोष कांबळे यांनी मॅकॅनिकल इंजिअनरची पदवी घेतली होती. काही वर्षे त्यांनी काम केले. मात्र, नंतर ते घरीच होते. नोकरीच्या शोधात इतरत्र ते फिरत होते. घरातून जातानाही त्यांनी मला नोकरी लागल्याचे सांगितले होते.
हाताचा पंजा उमटला !
संतोष कांबळे यांनी इमारतीवरून उडी टाकल्यानंतर दुसऱ्या मजल्यावर त्यांच्या हाताचे ठसे उमटले असल्याचे दिसून येत आहे. तेथून पुन्हा ते सुमारे शंभर फुटांवरून खाली पडले. त्यामुळे त्यांच्या डोक्याला आणि हातापायाला गंभीर जखम झाली.
५आत्महत्या करण्यापूर्वी गावकऱ्यांना फोन !
संतोष कांबळे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी करमाळा येथील आपल्या गावकऱ्यांना फोन केल्याचे पुढे आले आहे. ‘मी एक-दोन दिवसांत गावी येणार आहे,’ असे त्यांनी सांगितले होते. मात्र, अचानक त्यांनी हा निर्णय घेतल्याने गावकऱ्यांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे.