वसतिगृहात घुसून विनयभंग
By admin | Published: June 2, 2015 12:29 AM2015-06-02T00:29:03+5:302015-06-02T00:29:03+5:30
साताऱ्यातील प्रकार : म्हसवडच्या युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
सातारा : वसतिगृहात घुसून युवतीचा विनयभंग केल्याची घटना सातारच्या जिल्हा रुग्णालयातील नर्सिंग कॉलेज परिसरात रविवारी रात्री घडली. याप्रकरणी म्हसवड येथील युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनोज लोखंडे (रा. म्हसवड) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सातारच्या जिल्हा रुग्णालयाच्या आवारात नर्सिंग कॉलेज आणि वसतिगृह आहे. संबंधित युवती या वसतिगृहात राहते. मनोज लोखंडे २०१३ पासूनच संबंधित युवतीचा वेळोवेळी पाठलाग करीत होता. ‘मला तुझ्याशी लग्न करायचे आहे,’ असे तो तिला म्हणत असे.
रविवारी रात्री साडेसातच्या सुमारास मनोजने वसतिगृहाच्या इमारतीत बेकायदा प्रवेश केला आणि तेथील खिडकीवर लाथा मारून संबंधित युवतीकडे लग्नाची मागणी करू लागला. युवतीच्या मैत्रिणीलाही त्याने शिवीगाळ केली. नंतर संबंधित युवतीचा हात धरून तिच्याशी असभ्य वर्तन केले, असे फिर्यादीत म्हटले आहे. मनोजविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला असून, पोलीस उपनिरीक्षक आस्वर तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)