ऐतिहासिक किल्ले वासोटा सर करण्यासाठी बालमावळ्यांचा उत्साह !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:45 PM2021-02-17T16:45:53+5:302021-02-17T17:01:17+5:30
fort satara Kids- ऐतिहासिक किल्ले वासोटा पाहण्यासाठी बहुसंख्य पर्यटक व गिरीप्रेमी येतात. काही बालमावळ्यांचा उत्साहदेखील मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत साताऱ्यातील हेमर साळुंखे, कृपा साळुंखे, रुचा चव्हाण या चिमुकल्यांनी मोठया उत्साहात किल्ले वासोटा पुर्णपणे यशस्वीरित्या सर केला. त्याचे गिरीप्रेमींकडून विशेष कौतुक होत होते.
पेट्री/ सातारा :ऐतिहासिक किल्ले वासोटा पाहण्यासाठी बहुसंख्य पर्यटक व गिरीप्रेमी येतात. काही बालमावळ्यांचा उत्साहदेखील मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत साताऱ्यातील हेमर साळुंखे, कृपा साळुंखे, रुचा चव्हाण या चिमुकल्यांनी मोठया उत्साहात किल्ले वासोटा पुर्णपणे यशस्वीरित्या सर केला. त्याचे गिरीप्रेमींकडून विशेष कौतुक होत होते.
कोयनेच्या घनदाट अभयारण्यात वासोटा हा वनदुर्ग. दुर्गप्रेमींचे ट्रेकिंगसाठी आकर्षक ठिकाण म्हणजे ऐतिहासिक किल्ले वासोटा. व्याघ्र प्रकल्प व बामणोली वन्यजीव वनक्षेत्रातील किल्ले वासोटा बफर व कोअर क्षेत्रात येते. साहसी ट्रेकची आवड असणारे अनेक दूर्गप्रेमींचे आकर्षण. वनखात्याच्या चेकपोस्टपासून पुढे खड्या चढाईने दोन तासांत किल्याच्या माथ्यावर पोहचता येते.
संपूर्ण महाराष्ट्रातून पर्यटक मोठ्या संख्येने वासोटा ट्रेकींगसाठी येत आहेत. बामणोलीपासून साधारण एक- दीड तास बोटीने प्रवास करून मेट इंदवलीत येतात. कोरोनाच्या पाश्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगसाठी बांबुचे बॅरिगेट्स तसेच पर्यटक, गिरीप्रेमींची टेम्प्रेचर तपासणी तदनंतर पर्यावरणाचा समतोल तसेच वन्यजीवांच्या सुरक्षिततेसाठी सर्व प्रकारच्या प्लास्टिकची नोंद करून वनविभागाच्या परवानगीने दुर्गवारीस सुरुवात होते.
शनिवार, रविवारी बहुसंख्य पर्यटक ट्रेकिंगसाठी येताना पाहायला मिळतात. चोंहोबाजुला दाट हिरवीगार झाडी त्यात खडतर तसेच पुर्णतः चढ-उतार म्हणजे गिरीप्रेमींसाठी खास पर्वणीच. यामुळे ट्रेकिंगसाठी बहुतांशी पर्यटक या ठिकाणी येतात.
छत्रपती शिवाजी महाराज की जय...,छत्रपती संभाजी महाराज की जय..., जय भवानी जय शिवाजी... अशा घोषणेमुळे आलेल्या उत्साहाच्या बळावर मोठया उत्साहाने वासोटा किल्ला सर केला. दीड-दोन तासांचा पायी प्रवास करत चिमुकल्यांचा उत्साह तसूभरही कमी झालेला नव्हता.
खाचखळगे अन् दगडगोटे यशस्वीरित्या पार
साताऱ्यातील हेमर साळुंखे याअवघ्या पाच वर्षाच्या बालमावळ्याने कोणाच्याही मदतीशिवाय न दमता मोठया उत्साहाने खाचखळगे, घसरटे दगडगोटे असलेली दोन तास खडी चढाई व दीड तास तीव्र उतार यशस्वीरित्या पार करून पर्यटकांचे लक्ष वेधून घेतले होते. त्याच्या समवेत सात ते दहा वर्षाच्या तिघी चिमुरडीही होत्या. प्रेरणा, प्रोत्साहन मिळावे यासाठी त्यांचेदेखील गिरिप्रेमींकडून टाळ्या वाजवून विशेष कौतूक केले गेले.
आत्तापर्यंत बहुतांशी गडकोट, किल्यांना भेटी दिल्या. परंतु हा ऐतिहासिक वासोटा किल्ला सर करणं म्हणजे मोठं आव्हान होतं. चढताना आमची दमछाक होत होती. परंतु या चिमुकल्या मावळयांचा उत्साह पाहून त्यांच्याकडून आम्हाला प्रेरणा मिळत गेली.
- महेंद्र साळुंके,
गिरिप्रेमी मुंबई.