गावकारभारी निवडण्यात साऱ्यांनाच उत्साह
By admin | Published: August 4, 2015 11:16 PM2015-08-04T23:16:57+5:302015-08-04T23:16:57+5:30
यांची निवडणूक ...आम्हाला तोटा !
सातारा : जिल्ह्यातील विविध ठिकाच्या ५५० ग्रामपंचायतींचे भवितव्य आज (मंगळवार) मशीनबंद झाले. यानिमित्तानं गावोगावचे राजकारण ढवळून निघाले होते. ही ग्रामपंचायत निवडणूक राजकीय नेत्यांच्या प्रतिष्ठेची बनली होती. साहजिकच गावोगावी जास्तीत जास्त मतदानासाठी कार्यकर्ते झटताना दिसले. इतर वेळी कुणाला उचलूही न लागणाऱ्यांनी आज चक्क वयोवृद्धांना उचलून घेऊन मतदान केंद्रावर पोहोचवलं. तेव्हा त्यांच्यात दडलेल्या समाजसेवकाचे दर्शन झाले. उन्हातून चालणाऱ्या एखाद्या पादचाऱ्याला कधी आपल्या गाडीवर बसवलं नसेल पण आज चक्क चारचाकी वाहने पाठवून शहरात असलेल्या मतदारांना गावाकडे घेऊन आले. तेव्हा त्यांच्यातील चिकाटी दिसली. अशा तऱ्हेने गावोगावी झाडून मतदान झाले. मतदानादिवशी काय-काय घडलं, याचं हे सचित्र दर्शन...
खुर्चीखाली केळं अन् सफरचंद !
खेड ग्रामपंचायत निवडणुकीचं वातावरण चांगलच तापलेलं पाहायला मिळालं. शेवटच्या क्षणापर्यंत छुप्या पद्धतीने मतदारांना आकर्षित करण्यासाठी कार्यकर्ते विविध मार्ग अवलंबत होते. काहींनी पोलिंग बुथवर बसणाऱ्या एजंटांच्या खुर्चीखाली केळं अन् सफरचंद ठेवली होती. मतदार ओळखीचा दिसल्यानंतर त्याला हळूच एक सफरचंद देण्यात येत होतं. सफरचंद दिल्यानंतर नमस्कार करून त्याचे स्वागत केले जात होते. मात्र एका कार्यकर्त्याच्या हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर सर्व फळे पोत्यात भरून एका घरात नेण्यात आली.
यांची निवडणूक ...आम्हाला तोटा !
खेड ग्रामपंचायतीमध्ये पोलिंग बूथच्या शंभर मीटर अंतरापर्यंत असणारी दुकाने पोलिसांनी बंद करायला लावली होती. मग त्यामध्ये किराणा मालापासून पानटपरीपर्यंत सर्वच दुकाने बंद होती. निवडणुकीमध्ये घोळका करून लोक चौका-चौकात उभी राहात असतात. त्यामुळे गप्पांच्या ओघामध्ये दुकानातून कोणी काहीही खरेदी करत असतं. हा एकच दिवस असा असतो की या दिवशी दुकानदारांचा आठवड्याचा व्यावसाय एका दिवसात होत असतो. मात्र, पोलिसांनी दुकाने बंद करायला लावल्यामुळे त्यांच्या व्यावसायावर परिणाम झाला. यांची होतेय निवडणूक अन् आम्हाला होतोय तोटा, अशी संतप्त प्रतिक्रिया एका दुकानदाराने पोलिसांसमोरच व्यक्त केली.
..तर भरपूर दान केलं असतं !
एका मतदान केंद्रावर डोक्यावर पाटी घेऊन एक महिला आली होती. तिच्या पाटीमध्ये देव, देवीच्या मुर्त्या ठेवण्यात आल्या होत्या. प्रत्येक कार्यकर्त्याजवळ जाऊन ती हात पुढे पसरून पैसे मागत होती. त्यावेळी तेथे असलेल्या एका कार्यकर्त्याने ‘तुझं जर मतदान असतं तर तुला भरपूर दान केलं असतं,’ असं मिश्किल वक्तव्य केलं. बाकीच्या कार्यकर्त्यांनी त्याच्या बोलण्याला हसून दाद दिली. आदल्या रात्री मतदारांकडे ‘लक्ष्मी’ फिरली असावी, असं त्याच्या बोलण्यावरून उपस्थितांना जाणवले.