वडूज येथे पारायण सोहळ्याची उत्साहात सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:39 AM2021-02-16T04:39:53+5:302021-02-16T04:39:53+5:30
वडूज : ‘ज्ञानोबा, माऊली, तुकाराम... बोला पुंडलिक वर दे हरी विठ्ठलऽऽ’च्या जयघोषात कोरोना मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करीत मोजक्याच ...
वडूज : ‘ज्ञानोबा, माऊली, तुकाराम... बोला पुंडलिक वर दे हरी विठ्ठलऽऽ’च्या जयघोषात कोरोना मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करीत मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत सोमवारी वडूजमध्ये येथील श्री सिद्धिविनायक सभामंडपातील श्री ज्ञानेश्वरी पारायण समाप्ती सोहळ्याची सांगता झाली.
हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री सिद्धिविनायकाचा वार्षिक रथोत्सव व श्री ज्ञानेश्वरी पारायण सांगता उत्साही वातावरणात पार पडली. खबरदारी म्हणून यावेळी शहरातून गाव प्रदक्षिणेपेक्षा मंदिर प्रदक्षिणा घालण्यात आली. पारायण सभामंडपात सकाळी सात वाजता विजय महाराज लोणीकर यांच्याहस्ते श्री ज्ञानेश्वरी पारायणाची सांगता झाली. सकाळी नऊला काल्याचे कीर्तन झाल्यानंतर दहीहंडी फोडण्यात आली. त्यानंतर अकराला जयंत कुलकर्णी यांचे श्री गणेश जन्माचे कीर्तन झाल्यानंतर मानकरी, भाविकांच्या उपस्थितीत आकर्षक रथामध्ये श्रींची व ज्ञानेश्वरी माऊलींची प्रतिमा ठेवण्यात आली.
यावेळी पारायण मंडळाचे सदस्य, शहरातील मान्यवर, ग्रामस्थ व विविध सार्वजनिक मंडळांचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत रथपूजन करण्यात आले. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास श्रीं सिद्धिविनायक व ज्ञानेश्वर माऊलींचा रथ श्री सिद्धिविनायक मंदिराला प्रदक्षिणा घालून भाविकांच्या दर्शनासाठी उभा करण्यात आला. यावेळी दर्शन सुलभ होण्यासाठी व कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी पारायण मंडळाने योग्य ती खबरदारी घेतली होती. यादरम्यान प्रा. गुणवंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखालीॲकॅडमीच्या मुलांनी दर्शन रांगा व्यवस्थित करून भक्तांना दर्शन घेण्यास मदत केली. पारायण मंडळामार्फत ठिकठिकाणी सॅनिटायझरचा वापर करून ‘विना मास्क दर्शन नाही’ असा निर्णय घेतला.
याप्रसंगी शिवाई ग्रुपतर्फे सर्व भाविकांना योग्य ती काळजी घेत लाडू प्रसादाचे वाटप करण्यात आले. काशीविश्वेवर महादेव मंदिरातील पिडींवर आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. भाविकांनी श्रीसिद्धिविनायकाच्या दर्शनाबरोबर हेमाडपंथी मंदिर असलेले श्री काशीविश्वेवर मंदिरातील महादेवाच्या पिडींचे भक्तिभावाने दर्शन घेतले. वडूज पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवलेला होता.
यावेळी पाळणे व खेळणी आणि गाव प्रदक्षिणेने रथोत्सव न झाल्याने बालचमू व महिला वर्गात थोडीशी नाराजी दिसून येत होती. रात्री उशिरापर्यंत श्री सिध्दिविनायक व रथाचे दर्शन घेतले जात होते.
फोटो : १५वडूज-पारायण
वडूज येथील श्री सिद्धिविनायक सभामंडपात श्री ज्ञानेश्वर पारायण सांगता सोहळ्यात आरती करताना वाचक, भाविक उपस्थित होते.
१५वडूज-पारायण
वडूज येथील काशीविश्वेश्वर महादेव मंदिरातील शिवलिंगावर फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. (छाया : शेखर जाधव)