Coronavirus in Maharashtra कोरोना रुग्णाचा संपूर्ण प्रवास अवघ्या सहा तासांत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 10:51 PM2020-05-20T22:51:30+5:302020-05-20T22:53:34+5:30
पण तो या धक्क्यातून बाहेर येईपर्यंत सर्वांनाच वाट पाहावी लागते. रुग्णाची माहिती काढून घेण्यासाठी योग्य वेळ पाहून आरोग्य यंत्रणा पोलिसांना पाचारण करते. त्यानंतर रुग्णाशी फोनवर माहिती घेऊन पोलीस त्याच्या निकट सहवासितांना क्वॉरंटईन करतात.
प्रगती जाधव-पाटील।
सातारा : कोरोना रुग्ण सापडल्यानंतर त्यांचा प्रवास आणि त्यांचे निकट सहवासित यांची माहिती काढणं आरोग्य विभागासाठी तसं फारच जिकिरीचं जात होतं. कोरोना विषाणूचा पसार रोखण्यासाठी पोलिसांनी याकामी आपल्या तपास यंत्रणा कौशल्याचा वापर करून अवघ्या ६ तासांच्या आत रुग्णाच्या गेल्या दीड महिन्याचा प्रवास शोधून काढत कोरोना प्रसार नियंत्रणात आणण्याच्या कामी यशस्वी प्रयत्न केले आहेत.
सातारा जिल्ह्यातील क-हाड भागात कोरोना रुग्णांची संख्या शंभरी गाठू लागले आहेत. कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला की त्याचा जबरदस्त मानसिक धक्का रुग्णासह त्याच्या नातेवाइकांना बसतो. पहिल्या टप्प्यात सर्वाधिक माहिती रुग्णाकडून मिळण्याची अपेक्षा असते; पण तो या धक्क्यातून बाहेर येईपर्यंत सर्वांनाच वाट पाहावी लागते. रुग्णाची माहिती काढून घेण्यासाठी योग्य वेळ पाहून आरोग्य यंत्रणा पोलिसांना पाचारण करते. त्यानंतर रुग्णाशी फोनवर माहिती घेऊन पोलीस त्याच्या निकट सहवासितांना क्वॉरंटईन करतात.
मानसिक धक्क्यामुळे रुग्णाला बऱ्याच गोष्टी आठवत नाहीत, त्यामुळे तपासाच्या दुसºया टप्प्यात रुग्णाच्या कॉल डिटेल्स शोधल्या जातात. दीड महिन्याची कॉल तपासणी केल्यानंतर प्रत्येकाला फोन करून तब्बल ४६ प्रश्नांची उत्तरे पोलीस घेतात. तपासाच्या तिसºया टप्प्यात रुग्णाने दिलेली माहिती, कॉल रेकॉर्डची माहिती याच्या आधारे रुग्णाचा प्रवास मांडतात. त्यामुळे रुग्ण कुठून, कसा फिरलाय आणि त्यामुळे कोणाला कशी बाधा होण्याचा संभव आहे, याचा योग्य अनुमान काढण्यास मदत होते.
साता-यात सहाययक पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नानासाहेब कदम, सातारा तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शिवाजीराव भोसले आणि शाहूपुरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे यांचे पथक कार्यरत आहे.
प्रत्येक कॉलचे होतेय रेकॉर्डिंग
कोरोनाची लागण झाल्याचे समजल्यावर रुग्णाला मानसिक धक्का बसतो. त्यामुळे तो अनेक गोष्टी विसरण्याची शक्यता गृहीत धरून पोलीस कॉल डिटेल्स काढतात. दीड महिन्यात झालेल्या प्रत्येक कॉलवर फोन करून त्यांचाकडून माहिती घेण्यात येते. हा प्रत्येक फोन रेकॉर्ड होतो. अनेकदा वरिष्ठ अधिकारी या रेकॉर्डिंगच्या आधाराने अधिक माहितीही काढतात.
पोलिसी भाषा ठरतेय अनिवार्य
कोरोनाच्या धसक्याने अनेक रुग्ण शांत राहतात. वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्याकडून माहिती काढणेही मुश्कील जाते. अशावेळी पोलिसी खाक्याचा आवाज ऐकला की रुग्ण सहकार्य करण्याची तयारी दर्शवितात. अनेकदा पोलीस समुपदेशक म्हणून रुग्णांशी बोलतात, त्यांच्या माहिती देण्याने त्यांच्या जीवलगांना कसे वाचवता येईल, हे पटवून देतात. त्यानंतर मात्र रुग्ण खुलेपणाने बोलायला तयार होतो.
कोरोना रुग्ण दाखल झाल्यानंतर अवघ्या अर्धा तासात आमची यंत्रणा सज्ज राहते. रुग्णाच्या प्रवासाची पूर्ण कुंडली आम्ही अवघ्या ६ तासांत काढतो. कोरोनाबाबत न्यूनगंड तयार झाल्याने माहिती लपवली तर प्रवास समजायला अगदी २४ तासही लागतात; पण साताऱ्यातील रुग्ण पोलिसांना सहकार्य करून संसर्गितापर्यंत पोहोचण्यासाठी सर्वतोपरी मदत करत आहेत.
- समीर शेख,
सहायक पोलीस अधीक्षक, सातारा