तरुणांसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे उद्योजक निर्माण अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:40 AM2021-07-28T04:40:28+5:302021-07-28T04:40:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिरवळ : ‘तरुणांना त्यांच्या मनातील उद्योग, व्यवसाय उभा करण्यात मदत करण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पुढे सरसावली ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरवळ : ‘तरुणांना त्यांच्या मनातील उद्योग, व्यवसाय उभा करण्यात मदत करण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पुढे सरसावली आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांच्या संकल्पनेतून आणि प्रदेश सरचिटणीस तुषार जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात हे अभियान राबविण्यात येणार आहे,’ अशी माहिती राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेश सचिव गजेंद्र मुसळे यांनी दिली.
यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत काही दिवसांपूर्वी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या अभियानाची घोषणा करण्यात आली होती. या अभियानांर्गत उद्योग-व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या तरुणांची नोंदणी करण्यात येणार आहे. त्यांना केंद्र व राज्य शासनाच्या सर्व योजनांची व अनुदानांची माहिती देण्यात येणार आहे. त्याचबरोबर तरुणांना जो उद्योग - व्यवसाय उभा करायचा आहे. त्याबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन, उद्योग - व्यवसायाच्या प्रत्यक्ष क्षेत्र भेटी, प्रकल्प अहवाल, भांडवल उभारणीचे पर्याय, यंत्र सामुग्री आणि पायाभूत सुविधा उभारणी याबाबतचे मार्गदर्शन आणि सहकार्य राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून येणाऱ्या वर्षभरात किमान पाचशे उद्योजक तयार करण्याचा मानस आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पश्चिम महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष सुहास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यामध्ये व शहरामध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे, याचा लाभ घ्यावा, असे आवाहन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेश सचिव गजेंद्र मुसळे, प्रदेश निरीक्षक अतुल शिंदे, जिल्हाध्यक्ष डॉ. वैभव कळसे, जिल्हा रोजगार सरचिटणीस सुशांत जाधव व खंडाळा तालुकाध्यक्ष प्रवीण खंडागळे यांनी केले आहे.