उद्योजक विदेशात चाललेत; देश कंगाल होतोय: नाना पटोले
By नितीन काळेल | Published: May 8, 2023 11:06 PM2023-05-08T23:06:27+5:302023-05-08T23:07:57+5:30
पंतप्रधानांना मन की बातच आवडते; काॅंग्रेसच प्रगतीपथावर नेईल.
नितीन काळेल, लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा: ‘देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मन की बात आवडते. पण, कधीही ते पत्रकार परिषदेला सामोरे गेले नाहीत. आज दररोज ५०० उद्योजक विदेशात जात आहेत. आपला पैसाही तिकडे चाललाय. त्यामुळे देश कंगाल होतोय. अशा काळात काॅंग्रेसच देशाला प्रगतीपथावर नेऊ शकते,’ असे मत काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले.
सातारा येथील समऱ्थ सदनमध्ये ज्ञानविकास मंडळ आयोजित वसंत व्याख्यानमालेत ‘काॅंग्रेसला साथ विकासाला हात’ या विषयावर पटोले बाेलत होते. यावेळी काॅंग्रेसचे ओबीसी विभाग प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, जिल्हाध्यक्ष डाॅ. सुरेश जाधव, अल्पना यादव, रणजितसिंह देशमुख, रजनी पवार, धनश्री महाडिक, प्रसाद चाफेकर आदी उपस्थित होते.
काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले म्हणाले, ‘लोकांचा वाटा हा सत्तेत असायला हवा. लोकांना लुटण्यासाठी सत्ता नसावी. काॅंग्रेसने नेहमीच जनतेचा विचार केला. प्रामाणिकपणे काम केले. त्यामुळेच आपण पुढे गेलो. सकारात्मक विचारामुळेच काॅंग्रेसने देशावरही ६० वर्षे राज्य केले. देशात आज भयावह स्थिती आहे. काॅंग्रेसच देशाला प्रगतीपथावर नेऊ शकते हे लोकांनाही पटायला लागले आहे.
आपण सुरक्षित असू तर विकास महत्वाचा असतो, असे सांगून पटोले पुढे म्हणाले, ‘राज्यातील उद्योगही दुसरीकडे चालले आहेत. अशावेळी राज्यातील राज्यकर्त्यांना वरील आदेशाचे पालन करावे लागत आहे. यापूर्वी सातारा जिल्ह्यातील पृश्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री होते. तर आताचे मुख्यमंत्रीही सातारा जिल्ह्यातील आहेत. या मुख्यमंत्र्यांना स्वायतत्ता राहिलेली नाही. हुकुमशाही आणि तानाशाहीने कारभार सुरू आहे. यातून काॅंग्रेसच बाहेर काढू शकते. तर कर्नाटकच्या विधानसभा निवडणूक निकालातूनही काॅंग्रेसच पुढे असल्याचे दिसून आले. एक्झीट पोलमध्ये काॅंग्रेसला ४५ ते ४६ आणि भाजपला २५ ते २६ टक्के मते मिळतील, असे दिसून आले आहे.