सातारा जिल्ह्यातील ९५ गावांत लम्पीचा शिरकाव, बळिराजाबरोबरच प्रशासनाचीही चिंता वाढली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2022 05:21 PM2022-09-28T17:21:36+5:302022-09-28T17:22:20+5:30
सातारा जिल्ह्यातील १० तालुक्यांत आतापर्यंत लम्पीचा प्रसार झाला आहे, तर बाधित पशुधनाचा आकडा १२८८ झाला आहे.
सातारा : जिल्ह्यातील बळिराजासमोर लम्पी त्वचारोगाचे संकट वाढत असून, मंगळवारी आणखी आठ जनावरांचा मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत लम्पीमुळे ८३ पशुधनाचा बळी गेला आहे, तर दुसरीकडे बाधितांचा आकडा वाढत जात १२८८ वर पोहोचलाय. तर जिल्ह्यातील ९५ गावांत लम्पी बाधित पशुधन आढळून आले आहे.
मागील एक महिन्यापासून राज्यात लम्पी त्वचारोगाचा प्रसार वाढला आहे. सातारा जिल्ह्यात तर दररोज नवनवीन गावांत बाधित पशुधन आढळत आहे. यामुळे बळिराजाबरोबरच प्रशासनाचीही चिंता वाढली आहे. सातारा जिल्ह्यातील १० तालुक्यांत आतापर्यंत लम्पीचा प्रसार झाला आहे, तर बाधित पशुधनाचा आकडा १२८८ झाला आहे. सोमवारपर्यंत ११४७ जनावरे बाधित होती. मंगळवारी एकाच दिवसांत नवीन १४१ जनावरे स्पष्ट झाली. त्यातच मंगळवारी आणखी ८ जनावरांचा लम्पीने मृत्यू झाला. त्यामुळे या रोगाने मृत झालेल्या पशुधनाची संख्या ८३ वर पोहोचली आहे.
सातारा जिल्ह्यात लम्पी त्वचारोग झालेले पहिले जनावर २ सप्टेंबरला कऱ्हाड तालुक्यातील वाघेरी येथे आढळून आले होते. त्यानंतर पहिल्या बाधित जनावराचा मृत्यूही वाघेरीतच झाला होता. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने याची दखल घेत विविध उपाययोजना हाती घेतल्या. लसीकरण करणे, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित केली. आता तर सप्टेंबरअखेर जिल्ह्यातील ३ लाख ५२ हजार गाय आणि बैलांना लम्पी प्रतिबंधित लसीकरण करण्याचे नियोजन आहे. त्यादृष्टीने पशुसंवर्धन विभागाने तयारी केली आहे. यासाठी जनावरांसाठी खासगी प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांचीही मदत घेण्यात येत आहे. जिल्ह्यातील अशा ६०० हून अधिक खासगी डॉक्टरांना प्रशासनाने ऑर्डर दिली आहे. तसेच प्रत्येक लसीकरणामागे त्यांना पैसे देण्यात येणार आहेत. यामुळे ३० सप्टेंबरपर्यंत गायी आणि बैलांना लसीकरण उद्दिष्ट पूर्ण होईल, असा विश्वासही पशुसंवर्धन विभागाला आहे.
पावणेतीन लाख जनावरांना लसीकरण...
जिल्ह्यात आतापर्यंत गाय आणि बैल यांनाच लम्पी त्वचारोगाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाने गाय आणि बैलांच्या लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यातील या पशुधनाची संख्या ३ लाख ५२ हजार इतकी आहे. आतापर्यंत २ लाख ८२ हजार १३१ पशुधनाला लस देण्यात आली आहे.