‘‘पृथ्वीराजां’’च्या पालिकेतील एण्ट्रीने अनेकांच्या भुवया उंचावल्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:39 AM2021-04-16T04:39:49+5:302021-04-16T04:39:49+5:30
कराड गेले वर्षभर प्रतीक्षेत असलेली आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या फंडातील रुग्णवाहिका बुधवारी कराड पालिकेत दाखल झाली. त्याचा लोकार्पण सोहळा ...
कराड
गेले वर्षभर प्रतीक्षेत असलेली आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या फंडातील रुग्णवाहिका बुधवारी कराड पालिकेत दाखल झाली. त्याचा लोकार्पण सोहळा स्वतः पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झाला. पण, या निमित्ताने सुमारे दोन वर्षांनंतर पालिकेत केलेल्या चव्हाणांच्या एण्ट्रीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत, हे मात्र निश्चित!
पृथ्वीराज चव्हाण हे खरंतर दिल्लीच्या राजकारणात रमणारे नेतृत्व; पण मध्यंतरीच्या काळात राज्यात राजकीय नेतृत्वाचा प्रश्न निर्माण झाला अन् सोनिया गांधी यांनी चव्हाणांना महाराष्ट्रात पाठवलं. त्यांनी मुख्यमंत्री म्हणून चांगले काम केले. ओघानेच त्यांना विधानसभेची निवडणूक लढवावी लागली आणि सलग दोन वेळा ते कराड दक्षिणमधून विजयी झाले आहेत.
दक्षिण विधानसभा मतदारसंघात कराड शहराचा समावेश होतो. साहजिकच पालिकेच्या निवडणुकीत लक्ष घालणे चव्हाणांना क्रमप्राप्त बनले. गत पालिका निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखालील जनशक्ती आघाडीने बहुमत मिळविले; पण निकालानंतर काही दिवसांतच निवडून आलेल्या बहुतांश नगरसेवकांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांचे ‘‘हात’’ रिकामेच राहिले. परिणामी त्यांनीही पालिकेकडे फारसे लक्ष दिलेले नाही.
गत वर्षी कोरोना महामारीचे संकट आले. कराड शहरासह तालुक्यामध्ये रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली. यावेळी रुग्णांची हेळसांड होऊ नये म्हणून आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड पालिकेला रुग्णवाहिकेसाठी निधी दिला. मात्र, आता कोरोनाची दुसरी लाट आली तरीही पालिकेने रुग्णवाहिका खरेदी केलीली नाही, ही बाब पृथ्वीराज चव्हाण यांच्या लक्षात आली. महिनाभरापूर्वी चव्हाणांनी कराडला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. त्यावेळी रुग्णवाहिका खरेदीचा विषय समोर आला आणि तुम्हाला जर रुग्णवाहिकेचा निधी नको असेल तर मला लेखी उत्तर द्या, असा इशारा त्यांनी पालिका प्रशासनाला दिला.
आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी रुग्णवाहिका प्रश्नावरून प्रशासनाला धारेवर धरल्यानंतर याच्या खरेदीला गती आली. बुधवारी कराड पालिकेत रुग्णवाहिका दाखलही झाली. त्याच्या लोकार्पण कार्यक्रमाला स्वतः पृथ्वीराज चव्हाण पालिकेत उपस्थित राहिले. वर्षभरावर कराड पालिकेची निवडणूक येऊन ठेपली असताना पृथ्वीराज चव्हाण यांची पालिकेतील एण्ट्री चर्चेची ठरली आहे. राजकीय जाणकारही येऊ घातलेल्या पालिका निवडणुकीशी त्याचा संदर्भ जोडू लागले आहेत. आता बघूया काळाच्या पोटात नेमकं काय दडलंय...
चौकट
आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचा कराड पालिकेत वावर तसा खूपच कमी; नऊ वर्षांपूर्वी ज्येष्ठ नेते दिवंगत पी. डी. पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण समारंभाला ते पालिकेत उपस्थित होते. त्यानंतर अंदाजे दोन वर्षांपूर्वी लोकसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांची पालिकेच्या शेजारी सभा होती. त्यावेळी उदयनराजेंना यायला वेळ होणार होता म्हणून पृथ्वीराज चव्हाण आमदार बाळासाहेब पाटील यांच्यासोबत पालिकेत बराच वेळ प्रतीक्षा करीत बसले होते, तर आता रुग्णवाहिका लोकार्पण करण्याच्या निमित्ताने चव्हाण पालिकेत उपस्थित राहिले होते.
चौकट
‘‘लोकशाही’’सह ‘‘भाजप’’नेही केले स्वागत
पालिकेत भाजपच्या रोहिणी शिंदे नगराध्यक्षा आहेत, तर जनशक्ती आघाडीचे बहुमत आहे. पण, बहुमतात असणाऱ्या जनशक्ती आघाडीच्या बहुसंख्य नगरसेवकांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली, तर नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांच्यासह भाजपचे नगरसेवक, लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील व त्यांचे नगरसेवक यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहात पृथ्वीराज चव्हाण यांचे स्वागत केले. यावेळी जनशक्ती आघाडीतील काही मोजके नगरसेवक उपस्थित होते बरं...
फोटो : कराड पालिकेला रुग्णवाहिका लोकार्पण करताना आमदार पृथ्वीराज चव्हाण व इतर.