पर्यावरण दिन विशेष: हरित साताऱ्याचं स्वप्न होतंय भंग; झाडांच्या बुंध्यांना प्लास्टिकच्या बाटल्या, फांद्यांना रंगीबेरंगी पिशव्या
By जगदीश कोष्टी | Published: June 5, 2023 05:18 PM2023-06-05T17:18:41+5:302023-06-05T17:19:01+5:30
अब्रूची लक्तरे झाडावर टांगली
जगदीश कोष्टी
सातारा : सातारा जिल्ह्याला नैसर्गिक साधनसंपत्ती लाभली आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगात दुर्मीळ जैव वनस्पती आढळून येतात. त्याचप्रमाणे सातारकरांनी हरित साताराचे स्वप्न पाहून त्यादृष्टीने मोहीम उघडली आहे. मात्र, पोवई नाक्यापासून काही अंतरावरच असलेल्या झाडांच्या बुंध्यांना प्लास्टिकच्या बाटल्या, त्याचप्रमाणे घरातील कचरा आणून भिरकवल्यामुळे झाडांच्या फांद्यांवर रंगीबेरंगी पिशव्या लटकताना पाहायला मिळत आहेत.
सातारा जिल्हा नैसर्गिकदृष्ट्या समृद्ध आहे. साताऱ्याच्या पश्चिमेला असलेल्या कास पुष्प पठारावर दुर्मीळ फुले दरवर्षी फुलत असतात. या पठाराला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला आहे. त्याचप्रमाणे महाबळेश्वरच्या डोंगरात घनदाट जंगल अनुभवास मिळते. वाई, पाटण, जावळीचे खोरे घनदाट जंगलांसाठीच ओळखले जाते. या परिसरात दुर्मीळ आणि औषधी वनस्पती मोठ्या प्रमाणावर असते. त्याचा वैद्यक क्षेत्रासाठी ही भरपूर उपयोग होत आहे.
सातारकर ही पर्यावरणाच्या दृष्टीने खूपच जागरूक असल्याचे दिसून येतात. त्यामुळे अनेक संस्था, संघटना, तरुणांचा गट, काही जण त्यांच्या परीने किल्ले अजिंक्यतारा, चार भिंत, कुरणेश्वर, यवतेश्वर डोंगरात झाडे लावतात. काहीजण झाडे जगवण्यासाठी डोंगरात फिरायला पाण्याच्या बाटल्या भरून घेऊन जातात. झाडांना पाणी घालतात. त्यामुळे उन्हाळ्यात या झाडांना जीवदान मिळत असते.
राजपथावरील पदपथवर नगरपालिकेने झाडे लावली आहेत. या झाडांना पाणी घालून ते व्यापाऱ्यांनी जगवली आहेत. त्यामुळे हरित सातारा होण्यास मदत होते. मात्र, काही विघ्नसंतोषी डोंगरांना वणवे लावत आहेत, तर काहीजण पर्यावरणाच्या मुळावर उठणाऱ्या प्लास्टिक पिशव्या, बाटल्यांचा अतिरेकी वापर करत आहेत, हे धोक्याचे आहेत.
अब्रूची लक्तरे झाडावर टांगली
सातारा पालिकेची घंटागाडी सकाळी कचरा संकलनासाठी दारावर येते. तरीही अनेक जण कचरा टाकायला वेळ मिळत नाही म्हणून तो प्लास्टिक पिशव्यांतून घेऊन बाहेर पडतात. पालिकेपासून हाकेच्या अंतरावरील झाडावर गाडीवरून भिरकवत असतात. यामुळं परजिल्ह्यातील पर्यटकांमध्ये चुकीचा संदेश जात आहे.
संरक्षक जाळीत बाटल्या...
सातारा पालिकेकडून पोवई नाक्याकडे जाण्याच्या मार्गावर झाडे लावलेली आहेत. जनावरांपासून ते वाचविण्यासाठी लोखंडी तारांची जाळी केली आहे. त्या जाळीत प्लास्टिक अन् काचेच्या बाटल्या खोचून टाकल्या आहेत. विशेष म्हणजे पालिका कर्मचारी ते बुंध्यातच पेटवून देतात.