महामारीत हजारो लोकांचे पोट भरले; अनुदानदेखील वेळेत मिळाले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:25 AM2021-06-30T04:25:18+5:302021-06-30T04:25:18+5:30
सातारा : शंभर वर्षांनंतर जगात महामारी आली. या अदृश्य विषाणूबरोबर लढत असताना जनता अक्षरश: मेटाकुटीला आली होती. मात्र, राज्य ...
सातारा : शंभर वर्षांनंतर जगात महामारी आली. या अदृश्य विषाणूबरोबर लढत असताना जनता अक्षरश: मेटाकुटीला आली होती. मात्र, राज्य शासनाने गोरगरिबांसाठी मोफत शिवभोजन देण्याचा निर्णय घेतल्याने गोरगरिबांचे पोट भरले, तसेच संबंधित केंद्र चालकांनादेखील वेळेत अनुदान दिल्याने त्यांनीसुद्धा उत्साहाने हे जेवण तयार केले.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये जनता भरडली गेली. गोरगरिबांच्या हाताला काम राहिले नाही, दोन वेळेचे पोट कसे भरणार? हा प्रश्न अनेकांना सतावत होता. त्याच वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवभोजन मोफत देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गोरगरीब जनतेला मोठा हातभार लागला, तसेच दिलासा मिळाला. शिवभोजन केंद्र चालकांनी मोफत जेवण देण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याची अंमलबजावणी केली. सोबतच प्रशासनानेदेखील त्यांची बिले तत्काळ मागून घेऊन अनुदानदेखील वेळेत वाटप केले, त्यानेदेखील उत्साहाने मोफत जेवण सुरू ठेवले आहे.
जिल्ह्यातील शिवभोजन थाळी केंद्रे : ३०
आत्तापर्यंत किती जणांनी लाभ : २ लाख २० हजार
प्रतिथाळी चाळीस रुपये अनुदान
शहरी भाग ५० रु., ग्रामीण भाग ३५ रु. इतके प्रत्येक थाळीसाठी अनुदान आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये मोफत धान्य, तसेच मोफत जेवण शासनाच्या वतीने देण्यात आले. त्यामुळे या सर्व बाबींचे शंभर टक्के अनुदान शासनाच्या वतीने देण्यात आले आहे.
थाळी संख्याही वाढली आणि अनुदानही
शासनाने दुसऱ्या लॉकडाऊनच्या काळामध्ये गोरगरिबांना मोफत शिवभोजन थाळी देण्याचा निर्णय घेतला. लाभार्थ्यांकडून एकही रुपया त्यासाठी घेतला जात नाही. मात्र, शासनाच्या वतीने शिवभोजन केंद्र चालकांना अनुदान दिले जाते. मेअखेरपर्यंत शासनातर्फे अनुदानाचे वाटप झालेले आहे. जूनची बिले मिळाल्यानंतर सर्व अनुदान वाटप होणार आहे, अशी माहिती पुरवठा विभागातील अव्वल कारकून महेश गंगातीर्थकर यांनी दिली.
कोट...
शिवभोजन केंद्र चालकांकडून प्रत्येक महिन्याला बिले मागून घेतली जातात, शासनाकडूनदेखील वेळेत अनुदान उपलब्ध होत असल्याने त्यांना तत्काळ अनुदान वाटप केले जाते. शिवभोजन केंद्र चालकांनीदेखील मोलाचे सहकार्य केले असल्याने गोरगरिबांना शासनाच्या या योजनेचा अत्यंत चांगला फायदा होत आहे.
- स्नेहा किसवे देवकाते जिल्हा पुरवठा अधिकारी
कोट..
शासनाने शिवभोजनच्या माध्यमातून गोरगरिबांना सवलतीच्या दरात जेवण देण्याचा निर्णय घेतला. अवघ्या पाच रुपयांत जेवण मिळत असल्याने गोरगरिबांची चांगली सोय झाली. आता तर पूर्णतः मोफत भोजन देण्यात येत आहे. शासनाकडून आमची बिले वेळेत मिळतात. बिलांच्या बाबतीत कोणतीही अडचण नाही.
-राजू शेडगे, शिवभोजन केंद्र चालक
कोट..
जिल्हा पुरवठा विभागाने आम्हाला प्रत्येक वेळी प्रोत्साहित केले. अत्यंत गरीब नाही, तर ते मध्यम वर्गात लोक असतात, अशांच्या लॉकडाऊनच्या काळात नोकऱ्या गेल्या आहेत. त्यांनादेखील दोन वेळचे अन्न मिळणे कठीण झाले आहे. आम्ही सुरुवातीपासूनच उत्साहाने या योजनेत सहभाग घेतला. शासनानेही आमच्या अनुदान वेळेत दिले.
-शिरीष बेंद्रे, शिवभोजन केंद्र चालक