फिरत्या चाकावर थाटलं सुसज्ज गॅरेज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:29 AM2021-05-30T04:29:26+5:302021-05-30T04:29:26+5:30

केसरकर पेठेतील रामचंद्र मोहिते यांनी केलेलं हे जुगाड गेल्या काही महिन्यांपासून चांगलंच चर्चेत आलं आहे. रामचंद्र मोहिते हे एमएटीला ...

Equipped garage on rotating wheels | फिरत्या चाकावर थाटलं सुसज्ज गॅरेज

फिरत्या चाकावर थाटलं सुसज्ज गॅरेज

Next

केसरकर पेठेतील रामचंद्र मोहिते यांनी केलेलं हे जुगाड गेल्या काही महिन्यांपासून चांगलंच चर्चेत आलं आहे. रामचंद्र मोहिते हे एमएटीला रिक्षाचे सुटे भाग, गॅरेजमधील कॉम्प्रेसर लावून सर्वांना मदत करतात. पण ही कल्पना कशी सुचली ही रंजक कहाणी आहे. रामचंद्र मोहिते यांनी तब्बल वीस ते पंचवीस वर्षे खासगी प्रवासी गाड्यांवर चालक म्हणून काम केले. मुंबई, दिल्ली, बंगलोर हा त्यांचा नेहमीचा मार्ग असे. या काळात गाडीत बिघाड झाला तर कोणत्याही गॅरेजला लावली जाई. अशावेळी इतर चालक, क्लिनर आराम करत असतात. पण मोहिते गॅरेजमधील कारागिराजवळच बसून राहत. इंजिन खोललं असेल तर त्यात काय-काय असते, ते काम कसे करतात, हे बघत असत. तसेच इंजिनमधून एअर टाकीत हवा येते हे त्यांनी पाहिले होते. अन् त्याच्या आऊटलेटला पाईप लावला तर टायरसाठी वापरता येतो, हे त्यातून त्यांना सुचलं. त्याचाच उपयोग पुढे या व्यवसायात केला.

मोहिते यांनी दहा वर्षांपूर्वी स्कूटरवर ही यंत्रणा बसवली होती. ती आता एमएटीवर बसवली आहे. यामध्ये हवेचा कॉम्प्रेसर एमएटीच्या इंजिनच्या मॅग्नेटला जोडला आहे. इंजिन सुरू केल्यानंतर पाठीमागे जोडलेल्या टाकीत हवा जमा होते. तेथून आऊटलेटमधून पंक्चर काढण्यासाठी हवेचा वापर केला जातो. गाडीवर एकच व्यक्ती बसेल एवढी जागा आहे. पाठीमागील सीटवर टुलकीट जोडली आहे. त्यामुळे पकड, पाने, स्क्रू ड्रायव्हर आदी बसवलेले आहेत. त्यामुळे कधी कोणत्याही साहित्याची गरज भासली तरी त्यांच्याकडे ते उपलब्ध आहे.

फॅन बेल्ट काढला की गाडी धावण्यासाठी तयार असते. साताऱ्यातील कोणत्याही भागातून फोन आला तर यांची दुचाकी तेथे पोहोचते. काहीवेळेत काम होत असल्याने सातारकरांचीही मदत होते. यातील सर्वाधिक मदत ही पोलीस, आरोग्य, पालिका कर्मचाऱ्यांना होत असल्याने त्यांच्यावर कारवाई झाल्याचेही आठवत नाही.

- जगदीश कोष्टी

चौकट :

रिक्षाची दोन चाके

एमएटीवर गॅरेज थाटत असताना अनेक वस्तू वेल्डिंग करुन जोडल्या आहेत. त्यामुळे गाडीचे आकारमान बदलले आहे. वजन वाढले आहे. हे सर्व घेऊन गाडी चालवताना थोडीशी कसरत करावी लागे. पण तीही गेल्या सहा महिन्यांपासून कमी झाली आहे. रिक्षाच्या पाठीमागील मांडी, दोन चाके जोडली आहेत. त्यामुळे गाडी चालविणेही सोपे झाले असून, काम करताना स्टॅण्डवर उभी करण्याची गरज नाही. रिक्षासारखीच ती उभी असते.

कोट :

पूर्वीच्या काळी गॅरेजची संख्या कमी असायची. त्यामुळे गॅरेजवाला काम करत असताना बघून-बघून लहान-मोठी कामे शिकलो. त्याचाच उपयोग आता केला. आता पावलोपावली गॅरेज आहेत. त्यामुळे ही पिढी फारसं शिकण्याच्या भानगडीत पडत नाही.

- रामचंद्र मोहिते

पंक्चर व्यावसायिक, सातारा.

फोटो

२९ संडे फोल्डरमध्ये २९ गॅरेज नावाने आहेत.

Web Title: Equipped garage on rotating wheels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.