पोलीस कोठडीतून आरोपीचे पलायन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 10:58 PM2017-10-01T22:58:47+5:302017-10-01T22:58:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : सातारा शहर पोलीस ठाण्याच्या कोठडीत असणारा सराईत चोरटा चंद्रकांत ऊर्फ चंदर लक्ष्मण लोखंडे (वय ३१) हा स्वच्छतागृहातून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला. रविवारी सकाळी सव्वाआठच्या सुमारास घडलेल्या या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली असून, लोखंडेच्या शोधासाठी विविध ठिकाणी पथके रवाना झाली आहेत.
दरम्यान, या प्रकरणात एका पोलिसाचे निलंबन, तर इतर तिघांची वेतनवाढ रोखण्यात येणार असल्याची माहिती
पोलीस अधीक्षकांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. याबाबत अधिक माहिती अशी की, चार दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखेने लोणंद (ता. खंडाळा) येथे दरोडा टाकण्यासाठी आलेल्या टोळीला पकडले होते. त्यावेळी त्यांच्याकडून मिरची पूडसह नॉयलॉन दोरी, मोबाईल, दोन दुचाकी जप्त केल्या होत्या. तसेच दरोड्याच्या तयारीत असणाºया चंद्रकांत उर्फ चंदर लक्ष्मण लोखंडे (वय ३१, रा. ढवळ, ता. फलटण. सध्या रा. शिरवळ, ता. खंडाळा) यालाही पकडले होते. त्यानंतर त्याची पोलिस कोठडीत रवानगी झाली होती. सध्या तो सातारा शहर पोलिस ठाण्याच्या कोठडीत होता. रविवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास त्याला व अन्य एका संशयिताला पोलिस कोठडीत असणाºया स्वच्छतागृहात नेले होते. त्यावेळी चंद्रकांत लोखंडे स्वच्छतागृहाच्या पाठीमागील बाजूची लाकडी खिडकी मोडून व गज वाकवून पसार झाला.
स्वच्छतागृहातून लोखंडे हा लवकर बाहेर येत नाही, म्हणून उपस्थित पोलिसांनी दरवाजा वाजविण्यास सुरुवात केली. पण आतून प्रतिसाद आला नाही. त्यामुळे पोलिसांनी दरवाजा तोडून पाहिले असता लोखंडे दिसून आला नाही. त्यामुळे पोलिसांची एकच पळापळ सुरू झाली. आसपास शोध घेतला पण तो आढळून आला नाही. त्यामुळे लोखंडे हा पळून गेल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सातारा शहर पोलिस ठाणे, शाहूपुरी ठाणे, सातारा तालुका ठाणे, बोरगाव पोलिस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेची पथके त्याच्या शोधासाठी रवाना झाली. याप्रकरणी हवालदार धनंजय धोंडीराम गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे.