वाई तहसील कार्यालयात २४ तास मदत कक्षाची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:40 AM2021-05-09T04:40:36+5:302021-05-09T04:40:36+5:30
वाई : वाई तालुक्यातील गावांमध्ये कोरोनो पॉझिटिव्ह रुग्ण निघाल्यावर नातेवाईक घाबरून जातात, अशा वेळी रुग्णाला योग्य उपचारासाठी कोठे दाखल ...
वाई : वाई तालुक्यातील गावांमध्ये कोरोनो पॉझिटिव्ह रुग्ण निघाल्यावर नातेवाईक घाबरून जातात, अशा वेळी रुग्णाला योग्य उपचारासाठी कोठे दाखल करायचे? कोरोनासाठी कोणते दवाखाने आहेत आणि तेथे गेल्यावर बेड उपलब्ध होईल का? अशा अनेक प्रश्नांमुळे कुटुंबातील सदस्य धास्तावलेले असतात. त्यामुळे नाहक त्यांची धावपळ होत असते. याचा अभ्यास करून वाईचे तहसीलदार रणजित भोसले यांनी वाई तहसील कार्यालयात २४ तास मदत कक्षाची स्थापना केली आहे.
नातेवाइकांनी फोन करून आपल्या रुग्णाची माहिती दिल्यास कुठल्या हॉस्पिटलमध्ये बेड मिळेल याची घरीच बसून खात्री करायची आहे. हा कक्ष तुम्हाला तत्काळ मदत करेल. तरी या मदत कक्षाचा फायदा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या नातेवाइकांनी करून घ्यावा, असे आवाहन तहसीलदार रणजित भोसले यांनी केले आहे. वाई शहरासह तालुक्यातील गावांमध्ये नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे व नियम, अटींचे उल्लंघन केल्याने जानेवारी महिन्यापासून कोरोनाने थैमान घातले आहे. ज्यांच्या घरात पॉझिटिव्ह रुग्ण सापडतात, त्यांच्या घरातील सदस्य घराबाहेर मुक्त संचार करतात. त्यामुळे कोरोनो रोगाचा गतीने फैलाव होऊन अनेक बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असल्याचे सध्याचे चित्र निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.