होतकरू युवकांच्या माहितीस्तव मत्स्यबीज प्रकल्पाची उभारणी : देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:40 AM2021-04-16T04:40:02+5:302021-04-16T04:40:02+5:30
औंध: माण-खटावच्या होतकरू युवकांना एखाद्या उद्योग व्यवसायाची माहिती घेता न आल्याने अनेक युवक व्यवसायात अडचणीत आले आहेत. सध्या माशांची ...
औंध: माण-खटावच्या होतकरू युवकांना एखाद्या उद्योग व्यवसायाची माहिती घेता न आल्याने अनेक युवक व्यवसायात अडचणीत आले आहेत. सध्या माशांची शेतीकडे महाराष्ट्रातील अनेक युवकांचा कल आहे. मात्र या प्रकल्पाची माहिती आपल्याकडे मिळत नसल्याने आपल्या दोन्ही तालुक्यातील युवक याकडे वळताना दिसत नाहीत. त्यामुळे होतकरू युवकांच्या माहितीस्तव या प्रकल्पाची उभारणी केली असल्याची माहिती हरणाई सूतगिरणीचे संस्थापक रणजितसिंह देशमुख यांनी दिली.
हरणाई सूतगिरणीच्या मागील बाजूस अडीच एकर क्षेत्रात मोठे तळे काढले असून यामध्ये ५० हजार मत्स्यबीज यावेळी सोडण्यात आले. यावेळी मार्केट कमिटीचे माजी सभापती अशोकराव गोडसे, राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. विवेक देशमुख, ॲड. अनुज देशमुख, विशाल देवकर,सयाजी सुर्वे,जनरल मॅनेजर रमेश भोसले, अमृत मटकल्ली, नीलेश देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी रणजितसिंह देशमुख म्हणाले, अडीच एकरात मत्स्यशेतीसाठी हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. यासाठी एक मोठे तळे काढण्यात आले आहे. यामध्ये साडेपाच फूट पाणीसाठा केला आहे. अंदाजे यामध्ये दीड कोटी लीटर पाणी बसेल इतके मोठे आहे. बाजूने आठ फूट उंचीची जाळी मारून बंदिस्त करण्यात आले आहे. गुजरातचे मत्स्य तज्ज्ञ संगम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ५० लाख रुपये खर्च करून हा प्रकल्प उभा केला आहे. यामध्ये आता थिलापिया मोनोसेक्स या प्रजातीचे बीज म्हणजे माशांची पिल्ले सोडण्यात आली आहेत.
हा प्रकल्प उभारणी मागचा एकच उद्देश आहे की दुष्काळी भागातील युवकांना एवढा मोठा नाही. परंतु छोटा उद्योग व्यवसाय उभारता यावा, याची संपूर्ण माहिती या ठिकाणी त्यांना मिळणार आहे. भविष्यात या मातीतून उद्योजक तयार व्हावेत, अशी भावना आमची असल्याचे रणजितसिंह देशमुख यांनी सांगितले.
फोटो आहे :
फोटो ओळ : खटाव तालुक्यातील येळीव येथे हरणाई सूतगिरणीच्या कार्यस्थळावर मत्स्य बीज सोडताना संस्थापक रणजितसिंह देशमुख, अशोकराव गोडसे, डॉ. विवेक देशमुख, विशाल देवकर उपस्थित होते. (छाया-रशिद शेख)