विकासकामांतील भ्रष्टाचार सत्ताधाऱ्यांसाठी शिष्टाचार
By admin | Published: November 17, 2016 10:19 PM2016-11-17T22:19:10+5:302016-11-17T22:19:10+5:30
दिलीप येळगावकर : म्हसवड पालिकेत ‘परिवर्तन’ करणारे भजी खाऊ
म्हसवड : ‘गेल्या पाच वर्षांपासूनच म्हसवड नगर-पालिकेतील सत्ताधाऱ्यांचा कारभार जनतेने पाहिला असून, त्यांनी विकासकामात केलेला भ्रष्टाचार हा त्याच्यांसाठी शिष्टाचार झाला आहे. दुसरे परिवर्तन घडवायला निघालेले भजी खाऊ नेते झाले आहेत. ते काय परिवर्तन घडवणार आहेत,’ असा जोरदार टोला माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी लगावला आहे.
म्हसवड, ता. माण येथे महायुती उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपचे पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री रवींद्र आनासपुरे, बाळासाहेब मासाळ, डॉ. राजेंद्र खाडे, दिलीप तुपे, बाळासाहेब खाडे, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख बाळासाहेब मुलाणी, शहरप्रमुख राहुल मंगरुळे आदींसह विविध पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
माजी आमदार डॉ. येळगावकर म्हणाले, ‘येथील पालिकेची निवडणूक व्यक्तीद्वेषाकडे नेण्याचा प्रयत्न सध्या काहीजणांकडून केला जात आहे. अशांना विकासकामांशी काही देणेघेणे नाही. यातून
जनतेचे हित होणार नाहीच. आम्ही सत्तेवर आल्यावर दहशत मोडीत काढू म्हणारेच दहशतवादी आहेत.’
राज्यात व केंद्र्रात जनतेने नाकारलेले जनतेचा काय विकास साधणार आहेत, असे सांगून डॉ. येळगावकर म्हणाले, ‘सत्ताधारी मंडळींनी माणगंगेत गटारीचे पाणी सोडले. त्यांनी माणगंगेची गटारगंगा केली असल्यामुळे शहरात साथीचे रोग आले आहेत. दोन वेळा आमदारकी भोगत असलेल्या येथील लोकप्रतिनिधीने नागरिकांच्या गरजेची कामे केली नाहीत. तरुणांच्या हाताला काम मिळावे यासाठी मंजूर झालेली एमआयडीसी नाकर्तेपणामुळे दुसरीकडे गेली आहे.
पालिका हद्दीत क्रीडांगण करता आले नाही. पालिका हद्दीत त्यांच्या स्थानिक चुकीच्या राजकारणात पाणलोट कार्यक्रमांतर्गत आलेला ३२ कोटी रुपयांचा निधी खर्च न करता परत गेला आहे. या निधीतून जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर झाली असती; पण लोकांच्या हितापेक्षा त्यांना आपले राजकारण महत्त्वाचे होते.
जिल्ह्यात इतर पालिका स्वच्छतेच्या बाबतीत पुढे आहेत. त्या तुलनेत स्वच्छतेच्या बाबतीत म्हसवड पालिकेचा नंबर खालून पहिला लागत आहे. मोठमोठ्या इमारती बांधल्या, बगिचा केला म्हणजे विकास झाला म्हणणे म्हणजे मुर्खाच्या नंदनवनात फिरल्यासारखे झाले.
गेल्या पाच वर्षांत विकासकामे केली म्हणजे सामान्य नागरिकांच्या हिताची किती केली आहेत. म्हसवडच्या नागरिकांचे यातून किती प्रश्न सुटले आहेत. सत्ताधारी गटाने लोकांचा भ्रमनिरास केला आहे.’
अशी खिल्लीही यावेळी डॉ. येळगावकर यांनी यावेळी उडविली. (प्रतिनिधी)
पक्ष विचाराची जनता सोबत...
पत्रकारांच्या प्रश्नावर डॉ. येळगावकर म्हणाले, ‘मित्र पक्षांचे पदाधिकारी आमच्या सोबत दिसत नसले तरी या पक्षांच्या विचारांची जनता मात्र आमच्या महायुती सोबत आहे. आम्ही शहरातील दहशत मोडून काढणार आहे.’ तसेच येळगावकर यांनी पत्रकारांच्या अनेक प्रश्नांची उत्तरेही दिली. दरम्यान, यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनानिमित्त मान्यवरांनी आदरांजली वाहिली. यावेळी महायुतीचे उमेदवार, शिवसैनिक व मान्यवर उपस्थित होते.